अमरावती,दि.24 - सूतगिरणी प्रभागातील ज्येष्ठ स्वास्थ्ट निरीक्षकासह बिटप्यून व पाच स्वच्छता कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. गुरुवारी उशिरा सायंकाळी आयुक्त हेमंत पवार यांनी ही कारवाई केली. निलंबितामध्ये ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक एकनाथ कुळकर्णी, बिटप्युन गोपाल सौदे, स्वच्छता कामगार ममता चंडाले, कमला सोनटक्के, द्रोपदी सारसर, मंजू धनिराम कलोसे, पुष्पा बलदेव चावरे यांचा समावेश आहे. याशिवाय स्वास्थ्य निरीक्षक विनोद टांक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेतील सभागृहनेता सुुनील काळे यांनी याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली होती. कुळकर्णी हे कामात हयगय करीत असून त्यांच्यावर कारवाई करावी, असे पत्र काळे यांनी दिले होते. याशिवाय बिटप्यून यांच्याजवळील हजेरी रजिस्टर प्रमाणित करण्यात न आल्याचे दिसून आले होते. शिवाय बिटप्यूनने दोन तीन दिवसांची हजेरी घेतली नसल्याचे दिसून आले. याशिवाय प्रभागात १७ पैकी केवळ ५ कामगार हजर दिसून आल्याचे काळे यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्याअनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी सीमा नैताम यांनी सात जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली. त्यावर आयुक्त हेमंत पवार यांनी अधिकृत शिक्कामोर्तब केले.