- जितेंद्र दखनेअमरावती - गतवर्षी सरासरीपेक्षा २५ टक्के कमी झालेल्या पावसाचा फटका यंदा जिल्ह्यातील साडेपाचशे गावांना बसणार आहे. विशेष म्हणजे, टँकरच्या संख्येतही यंदा कमी पावसामुळे वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आतापासून पाणीटंचाई आराखडा तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यावेळी मात्र पाणीटंचाईचा आराखडा हा तीन महिन्यांऐवजी वार्षिक आराखडा तयार केला जाणार आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा २५ टक्के कमी झालेल्या पावसामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न अधिक गडद हाेण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आतापासून पाणीटंचाई आराखड्याला सुरुवात केली आहे.
पाणीटंचाईची तीव्रता फारशी नव्हती. केवळ दोनशे गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यातील बहुतांश गावे मेळघाटमधील होती. मागील वर्षी मे व जून महिन्यात ११ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला होता, मात्र यंदाची परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे दिसून येते. यंदा आतापर्यंत सरासरी ४६ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामुळे नद्या व धरणांमध्ये किमान जलसाठा आहे. शिवाय भूजलस्तरात ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईचे संकेत आहेत.आतापर्यंत तीन टप्प्यांत पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात येत होता. टंचाईची तीव्रता पाहून उपाययोजना केल्या जात होत्या. त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा, मार्च व एप्रिल दुसरा आणि जूनमध्ये तिसरा, अशा तीन टप्प्यांत आराखड्याची विभागणी केली जात होती. मात्र, यावर्षीपासून एकाच टप्प्यात वर्षभराचा आराखडा तयार करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तसे पत्रसुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले आहे.
यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने टंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून पाणीपुरवठा विभागाकडून तहसीलनिहाय आराखडे मागविले आहेत. अद्याप पाच तालुक्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.-सुनील जाधवकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग