अमरावती - शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतविल्यास दामदुप्पट नफा देण्याची बतावणी करून आर्थिक फसवणुकींच्या घटनांचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. सायबर पोलिसांनी ८४ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा महत्प्रयासाने छडा लावला असताना, लोक अधिक नफ्याच्या प्रलोभनाला बळी पडून स्वत:चे बॅंक खाते रिकामे करवून घेत आहेत. परतवाड्याच्या व्यक्तीची शेअरमध्ये झालेली ३१ लाखांची फसवणूक ताजी असताना पुन्हा एकदा येथील एका इसमाने शेअरच्या नफ्यापोटी तब्बल ५३ लाख ९९ हजार रुपये ऑनलाईन गमावले आहेत.
२७ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान ती फसवणुकीची मालिका चालली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी १ मार्च रोजी दुपारी एका इसमाच्या तक्रारीवरून सहा कंपनीचे बॅंक खातेधारकांसह दोन व्हॉट्सॲप युजरविरूध्द फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. जानेवारी महिन्यात आरोपींनी येथील फिर्यादीस शेअर मार्केट ग्रुपवर जॉइन करून घेतले. तथा त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना एंजेलबीजी हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. दोन व्हॉट्सॲप युजर्सनी त्यांच्याशी संपर्क साधून शेअर खरेदी केल्यास भरपूर नफा मिळेल, अशी बतावणी केली.
आमिषाला पडले बळीफिर्यादी यांनी बनावट शेअरमध्ये गुंतवणूक केली. ते देखील नफ्याच्या आमिषाला बळी पडले. आरोपींनी त्यांच्या खात्यातून तब्बल ५३.९९ लाख रुपये सहा कंपन्यांच्या खात्यात वळवून घेतले. दिसत असलेली नफ्याची रक्कम काढण्याचा व अन्य खात्यात वळविण्याचा प्रयत्न केला असता, ती रक्कम निघाली नाही. पुढे आरोपींनी फिर्यादीला प्रतिसाद देणे बंद केले. त्यावेळी त्यांना फसवणुकीची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले.