अमरावती : शहरातील शुभोद कॉलनीतील रहिवासी शिवम बुरघाटे याने दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससीचा गड सर केला आहे. शिवम हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वादविवाद पट्टू असून त्याने देशात ६५७ वी तर राज्यातून ४९ वी रॅँक प्राप्त केली आहे. त्याला आयपीएस कॅडर मिळेल असा विश्वास त्याचे वडील सुनिल बुरघाटे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.
देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा-२०२२ चा निकाल मंगळवार २३ मे रोजी आयोगाने जाहीर केला. दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थी युपीएससीची तयारी करतात. मात्र यातील काहीच विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश प्राप्त होत असते. अशातच कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असलेल्या सुनिल बुरघाटे यांचा मुलगा शिवमने या परीक्षेत यश संपादन केले आहे. शिवमने दहावीपर्यंतचे शिक्षण हे शहरातील गोल्डन किड्स शाळेत घेतले. यानंतर त्याने कला विषयातून बारावीचे शिक्षण हे विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयातून घेतले. यानंतर शिवमने नॅशनल लॉ युनिवर्सिटी लखनऊ येथून बीए एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण घेत असतानाच कॉलेज फोरमच्या माध्यमातून मिळालेल्या मार्गदर्शनातून त्याने युपीएससीमध्ये करीयअर करण्याचा निर्धार केला.
एलएलबीच्या शेवच्या वर्षाला असतानाच २०२० मध्ये त्याने युपीएससीचा पहिला अटेम दिला. यात प्रिलीमध्ये त्याला यश मिळाले. परंतु मेन्सचा गड त्याला सर करता आला नाही. त्यामुळे त्याने एक वर्ष दिल्लीमध्ये राहून पुन्हा अभ्यास केला. आणि आपल्या दुसऱ्या अटेममध्ये वयाच्या २६ व्या वर्षी युपीएससी-२०२२ च्या परीक्षेत त्याने देशातून ६५७ वी रॅँक प्राप्त केली आहे. शिवमला आयपीएस कॅँडर मिळेल असा विश्वास त्याचे वडील सुनील बुरघाटे यांना आहे. शिवमला आयएसएस व्हायचे असल्याने तो युपीएससी-२०२३ ची परीक्षा देऊन तो त्याचा तिसरा अटेंमही देणार आहे.
वादविवाद स्पधेत १७ नॅशनल पुरस्कार
शिवम बुरघाटे हा महाविद्यालयीन जीवनामध्ये वादविवाद पट्टू राहिला असून त्याला विविध वादविवाद स्पर्धेमध्ये १७ नॅशनल पुरस्कार मिळाले आहेत. त्याच बरोबर २०१८ मध्ये त्याने अफगानिस्तान येथील आंतरराष्ट्रीय वादविवाद स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व केल्याची माहितीही वडील सुनिल बुरघाटे यांनी दिली.
शिवम लहापनापासूनच अभ्यासात हुशार
शिवम हा लहानपनापासूनच अभ्यासात हुशार आहे. त्याला पुस्तके तसेच वर्तमानपत्र वाचण्याचा छंद आहे. तो उत्तम वादविवाद पट्टू असून त्याने अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. तसेच त्याला क्रिकेट खेळण्याचाही छंद असून शिवमने मिळाविल्या यशा बद्दल पालक म्हणून त्याचा अभिमान असल्याचे शिवमचे वडील सुनिल बुरघाटे यांनी लोकमतला सांगितले.