अमरावती लोकसभा काँग्रेसने राखावी, नेत्यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 11:21 AM2023-06-06T11:21:28+5:302023-06-06T11:22:48+5:30
आयाराम-गयारामांना करू हद्दपार : तीन आमदार, बाजार समित्यांचा दिला दाखला
अमरावती :काँग्रेसनेलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माेर्चेबांधणी चालविली आहे. त्यानुसार राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघनिहाय काँग्रेसने २ व ३ जून रोजी आढावा घेतला. यात अमरावती लोकसभा मतदारसंघ अगोदर काँग्रेसने राखावा, अशी एकमुखी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याकरिता राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर या आघाडीवर होत्या, अशी माहिती आहे.
मुंबई येथे टिळक भवन काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत येत्या २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम घेण्यात आली. राज्यात महाविकास आघाडी कायम असली तरी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा, उमेदवार आणि काँग्रेसच्या राजकीय शक्तीची चाचपणी नाना पटोले हे करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने का ताब्यात घ्यावा, याची चिकित्सक मांडणी आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रदेश काँग्रेसकडे केली.
काँग्रेसकडे अनुसूचित जातीचा समक्ष आणि चांगला चेहरा आहे. काँग्रेसकडे तीन आमदार आणि बाजार समिती निवडणुकीत विजयाचाही दाखला देण्यात आला. तसेच जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत आणि महापालिकेत काँग्रेसची ताकद अधिक आहे. त्या तुुलनेत शिवसेना वा राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही, ही बाब जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. भाजपच्या धर्मांध राजकारणाला केवळ काँग्रेसचा उमेदवारच सडेतोड उत्तर देऊ शकतो, असे अनेक उदाहरणांनिशी पटवून दिले. यावेळी आमदार ॲड. यशेामती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप, मिलिंद चिमोटे, भय्या पवार, दिलीप एडतकर, किशोर बोरकर, डॉ. अंजली ठाकरे, नीलेश गुहे, संकेत कुलट, पंकज मोरे आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीतून अमरावती लोकसभेसाठी १०० टक्के काँग्रेसचा उमेदवार मिळणार आणि तो निवडून येणार, यात काहीच शंका नाही. आयाराम - गयाराम यांना येत्या लोकसभा निवडणुकीत हद्दपार केले जाईल. जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद आहे, ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली आहे.
- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
काही तांत्रिक कारणांनी अमरावती लोकसभा इतरांकडे गेला. मुळात ही जागा काँग्रेसची आहे. म्हणूनच वरिष्ठांकडे मागणी केली आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. जिल्ह्यात काँग्रेसची टॉप टू बॉटम बांधणी आहे.
- अॅड यशोमती ठाकूर, आमदार