अमरावती : हुंडा म्हणून तीन लाख रुपये देण्यास नकार दिल्याने नियोजित वराने लग्न मोडले. साखरपुड्यानंतरही विवाह संबंध तुटल्याने अखेर वागदत्त वधूने पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आरोपी वर धीरज दादाराव राऊत (३०, रा. सुरक्षा कॉलनी, अमरावती) याच्याविरुद्ध ८ जून रोजी दुपारी बदनामी व हुंडा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.
फिर्यादी तरुणीची एका मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून आरोपी धीरजशी ओळख झाली होती. तो भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहे. त्यामुळे दोघांच्याही बायोडाटाची एकमेकांच्या कुटुंबीयांत देवाणघेवाण झाली. तरुणीचा बायोडाटा धीरजच्या घरच्यांनी बघितल्यानंतर त्यांनी पुढील बोलणीकरिता तरुणीच्या कुटुंबीयांना त्याच्या घरी अमरावती बोलावले. दरम्यान, ९ जून २०२३ रोजी अमरावती येथे धीरज राऊतच्या घरी लग्न पक्के झाले. ११ जून २०२३ रोजी धीरज राऊतला जम्मू-काश्मीरला जायचे असल्याने १० जून रोजीच साखरपुडा करा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली. त्यामुळे त्याचदिवशी दोघांचा साखरपुडा झाला. साखरपुड्याला तरुणीच्या कुटुंबीयांनी धीरजला पाच ग्रॅमची अंगठी दिली. तसेच साखरपुड्याला अंदाजे एक लाख रुपये खर्चदेखील झाले. त्यावेळी लग्नाची तारीख दिवाळीनंतर काढू, असे ठरविण्यात आले.
पैसे दिले तरच लग्न
दरम्यान, धीरज १४ सप्टेंबर २०२३ ते १६ एप्रिलपर्यंत पुन्हा सुटीवर आला. परंतु त्याच्या घरच्यांनी लग्नाची तारीख काढली नाही. तो पुन्हा निघून घेला. १६ एप्रिल रोजी धीरजच्या नातेवाइकांनी तरुणीच्या कुटुंबीयांना अमरावती बोलावले. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करून वाद केला. दरम्यान, यंदाच्या २४ मे रोजी धीरज पुन्हा सुटीवर आला. तेव्हा तारीख काढू, कपडे घेण्याकरिता तुम्ही अमरावतीला या, असा निरोप आला. त्यानुसार,२६ मे रोजी तरुणी व तिचे नातेवाईक अमरावतीला आले. तेव्हा धीरजच्या नातेवाइकांनी तीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले तरच मी लग्नाला तयार आहे, नाहीतर मला लग्न करायचे नाही, असे धीरजने बजावले. त्यावर समेट घडून आला नाही.