- गजानन मोहोडअमरावती - ‘मे हीट’मुळे जलस्रोत कोरडे पडत असल्याने पश्चिम विदर्भात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. सद्यस्थितीत तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर आहे. यामध्ये ४३६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, ८६ गावांमध्ये ९१ टँकरद्वारे तहान भागविल्या जात आहे. गतवर्षी याच दिनांकाला ३० टँकर सुरू होते.
गतवर्षी यवतमाळ वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट राहिली आहे. शिवाय जून महिन्यात ६ व ऑगस्टमध्ये फक्त सात दिवस पावसाचे राहिल्याने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे भूजलस्तरात झपाट्याने कमी येत आहे. अशातच जलस्त्रोताला कोरड लागली व आचारसंहितेमध्ये पाणीटंचाईच्या उपाययोजना अडकल्याने तहानलेल्या गावांच्या दाहकतेमध्ये भर पडली आहे.
विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार किमान दोन लाख नागरिकांची तहान सध्या टँकरवर भागविल्या जात आहे. यामध्ये सर्वाधिक ६७ टँकर बुलडाणा जिल्ह्यात सुरू आहे, तर वाशिम व अकोला जिल्ह्यात निरंक आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यात १३, यवतमाळ जिल्ह्यात ६ टँकर सुरू आहेत. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने मे महिन्याअखेर विभागात २००वर गावांमध्ये टँकर सुरू होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २५७ विहिरींचे अधिग्रहणअमरावती विभागात सद्य:स्थितीत ४३६ खासगी विहीर व विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २५७, अमरावती ८६, वाशिम ५३, यवतमाळ २७ व वाशिम जिल्ह्यात १२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. विभागात सद्य:स्थितीत ८६ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. आठ दिवसांत पुन्हा ८४ गावांची भर पडण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले.