अमरावती : अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या घरातील रोख व सोन्याच्या दागिण्यांबाबत टिप देऊन ती चोरी यशस्वी करण्यात लाखमोलाचा सहभाग असलेली तरुणी अखेर गजाआड झाली. प्रियकराला झटक्यात श्रीमंत करू इच्छिणाऱ्या त्या प्रेयसीला फ्रेजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. तर अन्य दोन आरोपींकडून चोरीला गेलेले सुमारे ११ लाख ८ हजार रुपयांचे २७७ ग्रॅम सोने व २० लाख रुपये रोख असा ३१ लाख ७८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ठाणेदार अनिल कुरळकर यांच्या नेतृत्वातील ‘टिम फ्रेजरपुरा’ने हे बंपर यश मिळविले.
भातकुली तहसीलसमोरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरांनी २५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार ८ ऑक्टोबर रोजी नोंदविण्यात आली होती. मात्र, पुढे चोरीला गेलेले सोन्याचे दागिने २५० ग्रॅमपेक्षा जास्त असून सोबतच प्लॉट विक्रीतून आलेली २० लाखांची रोखसुध्दा चोरांनी पळविल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले होते. तपासादरम्यान सीसीटिव्हीने पोलिसांना अनेक पुरावे दिले. तरुणीने तिच्या प्रियकराला माहिती दिल्यानंतर ती चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. सबब, फ्रेजरपुरा पोलिसांनी शोएब खान मंजूर खान (२३, रा. ताजनगर), शेख जुबेर शेख ताज (३१, रा. सुफियाननगर) व शेख जुबेरच्या १९ वर्षीय प्रेयसीला अटक केली. गुन्ह्यातील संपुर्ण ३१ लाख रुपयांची जप्ती अवघ्या दोन तीन दिवसांमध्ये केल्याने ‘टिम फ्रेजरपुरा’चे काैतूक केले जात आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी तरूणी ही तंत्रनिकेतन तृतीय वर्षाची विद्यार्थीनी आहे.
तरुणीलाही अटक
फिर्यादी महिलेच्या पतीची जवळची आप्त असलेल्या १९ वर्षीय तरुणीने तिचा प्रियकर शेख जुबेरला त्या घरातील दागिने व रोख रकमेबाबत माहिती दिली. चोरीच्या वेळी ती तरूणी घटनास्थळाच्या शेजारी कारमधून आत बाहेर करताना सीसीटिव्हीत कैद झाली होती. त्या कारमुळे संपुर्ण प्रकरणाचा तत्काळ उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान चोरीचा संपुर्ण माल जुबेरने स्वत:कडे ठेवला होता. पोलिसांनी त्याच्या घरातून २७७ ग्रॅम दागिने व २० लाखांची रोख जप्त केली. तसेच कार देखील जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल कुरळकर, पीआय नितीन मगर, पीआय निशीकांत देशमुख, निलेश जगताप, शशीकांत गवई, विनोद काटकर यांनी केली.
आरोपींकडून २० लाखांची रोख व २७७ ग्रॅम दागिणे जप्त करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी एका तरूणीला देखील अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
- अनिल कुरळकर, ठाणेदार, फ्रेजरपुरा