अमरावती : तसा अमरावती ते नागपूरचा प्रवास अडीच ते तीन तासांचा. लक्झरी प्रवास करायचा असेल तर ३३५ रुपयांचे तिकीट काढून प्रवासी शिवशाही या वातानुकूलित बसला प्राधान्य देतात. मात्र, हीच लक्झरी बस प्रवाशांना प्रचंड यातना देत असल्याचा अनेकांचा वाईट अनुभव आहे. एसटी महामंडळाच्या गचाळ कारभाराची प्रचिती अमरावतीकर प्रवाशांना मंगळवारी आली. अमरावती टू नागपूरचा प्रवास तीन शिवशाहीअन् एक साधारण बसने करावा लागला. तेही पाच तासांत.
अमरावती येथील रहिवासी मंगेश शिंदे आपल्या वृद्ध आई- वडिलांसोबत मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास (एमएच ०६ बीडब्ल्यू ११०४) क्रमांकाच्या शिवशाही बसने नागपूरला जाण्यासाठी निघाले. अमरावती बसस्थानकातून निघालेल्या बसमध्ये पंचवटी चौकातच बिघाड आला. प्रवाशांची तारांबळ उडाली. काही वेळानंतर आगारातून दुसरी शिवशाही पाठविण्यात आली. तीदेखील तळेगाव घाट चढण्यापूर्वी बंद पडली. भर उन्हात प्रवाशांना ताटकळत राहावे लागल्याचे शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर तिसरी शिवशाही आली अन् घाट चढल्यानंतर तीही बंद पडली. एसटी महामंडळ आमचा अक्षरश: सूड घेत असल्याचा संताप बसमधील प्रवाशांनी व्यक्त केला. तीन शिवशाही बसमध्ये बिघाड आल्यानंतर अखेर (एमएच २७ बीएल ३९३८) या क्रमांकाच्या धुळे ते नागपूर साधारण बसमध्ये प्रवाशांना मिळेल त्या जागी बसविण्यात आले अन् नागपूरचा प्रवास सुरू झाला. पाच तासांनंतर ही बस नागपूर स्थानकावर पोहोचली आणि घामाघूम झालेल्या प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. एसी बसच्या तिकिटात जर साधारण बसने प्रवास करावा लागत असेल तर हे कसले सामान्यांचे सरकार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.