अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मेळघाटात घुबडांवर संक्रांत आली असून अवघ्या तीन दिवसात दोन घुबडांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण सध्या अस्पष्ट आहे. मृत घुबडाच्या शरीरातील काही भाग अमरावती व नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहे. या अहवालाची वन व वन्यजीव विभागाला प्रतीक्षा आहे.
मेळघाटातील चौराकुंड येथे एक चट्टेरी वन घुबड १९ नोव्हेंबरला मृत अवस्थेत आढळून आले. वन घुबड शेड्यूल ४ मध्ये अंतर्भूत आहे. घटनास्थळ पंचनामा करून वन व वन्यजीव अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याचे शवविच्छेदन करून घेतले,पण शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. यानंतर धारणी लगतच्या नारवाटी गाव शिवारातील शेतातील विहिरीत एक घुबड २२ नोव्हेंबरला मृतावस्थेत आढळून आला. याची माहितीसुद्धा वनविभागाला दिली गेली.
लक्ष्मीचे वाहन म्हणून मान्यताप्राप्त व रात्रीचा शिलेदार असलेला घुबड हा पक्षी मेळघाटात संकटात सापडला आहे. या पक्ष्यांना अज्ञात आजाराने ग्रासले असण्याची शक्यता वर्तविला जात आहे. अति थंडीचा फटकाही त्यांना बसत आहे.
मृत्युमुखी पडलेले घुबड रानपिंगळा नाही. ते चट्टेरी वन घुबड आहे. वयोमानानुसार किवा थंडीमुळे ते मृत्यू झाले असावेत. यावर संशोधन व्हायला हवे.
- डॉ. जयंत वडतकर,मानद वन्यजीव रक्षक तथा अभ्यासक, अमरावती
मृत आढळून आलेल्या घुबडाचे शवविच्छेदन केले गेले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. अमरावती आणि नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
- गिरीश जतकर,वनपरिक्षेत्र अधिकारी, हरिसाल