- गणेश वासनिकअमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२३-२०२४ या वर्षासाठी विद्यार्थ्यांना विनाअट कॅरी ऑन देण्याचा निर्णय घेतला आहे. सीजीएस पद्धतीमधील सत्र १ ते ४ मधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सत्र ५ मध्ये प्रवेशित करण्याच्या मागणीला सभेने मान्यता प्रदान केली आहे. त्याअनुषंगाने कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्या स्वाक्षरीचे शनिवारी पत्र जारी करण्यात आले आहे.
अमरावती विद्यापीठात २४ जुलै रोजी कुलगुरूंना रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने निवेदन देऊनविना अट कॅरी ऑन मागणी करण्यात आली होती. तसेच गत ६० दिवसांपासून याच मागणीसाठी युवक कॉंग्रेसने आंदोलन पुकारले हाेते. विद्यार्थी हिताचा विचार करून प्रशासनाने हा विषय विद्वत परिषदेच्या निर्णयार्थ ठेवला होता. त्यानुसार अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना विना अट कॅरी ऑन करून पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा घेतलेल्या या निर्णयाबाबत आंदोलकांसह युवक कॉंग्रेसने जल्लोष साजरा केला. रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदचे जिल्हा संघटक आकाश हिवराळे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे. शनिवारी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी विद्यार्थ्यांना विना अट कॅरी ऑन लागू करणार असल्याचे लेखी पत्र दिले. अमरावती विद्यापीठाने शनिवारी ऑनलाइन विद्वत परिषदेची मीटिंग घेतली. यात विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यार्थ्यांचे एक वर्ष शैक्षणिक नुकसान होवू नये,यासाठी विना अट कॅरी ऑन लागू करण्याचा निर्णय घेतला.