अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ५० गुणांचे प्रश्न सोडविल्यास १०० गुण मिळतील, या आशयाचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे हे परित्रक विसंगती आणि विरोधाभास निर्माण करणारे आहे, असा आरोप सिनेट सदस्य विवेक देशमुख यांनी केला आहे. परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी २४ ऑक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकावर सिनेट सदस्य विवेक देशमुख यांनी आक्षेप घेतला. अमरावती विद्यापीठाने बहुपर्यायी प्रश्नावली तयार करणे, परीक्षा घेणे, वेळापत्रक तयार करणे, मूल्यांकन, गुणदान आदी बाबी महाविद्यालयांवर सोपविल्या आहेत. २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
महाविद्यालयांना विषयनिहाय बहुपर्यायी ४० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागल्या असून, ४० पैकी कोणतेही २० प्रश्न सोडवावे लागतील. विद्यर्थी पूर्ण प्रश्न सोडवू शकतील. मात्र, मू्ल्यांकन करताना अचूक २० प्रश्न तपासले जातील, असे परीक्षा संचालकांनी म्हटले आहे. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण मिळतील. त्यामुळे ४० पैकी ५० टक्के प्रश्नांची उत्तरे बरोबर असल्यास एका प्रश्नास दोन गुण याप्रमाणे ४० गुण म्हणजे १०० टक्के गुण प्राप्त होतील. ५० टक्के प्रश्नांच्या अचूक उत्तरावर १०० टक्के गुणांची खैरात हा अफलातून प्रयोग असल्याची टीका विवेक देशमुख यांनी केली आहे. निकालाअंती याची प्रचिती येईल, असा दावा त्यांनी केला.
बहुपर्यायी प्रश्नावलीमध्ये एका प्रश्नासाठी चार उत्तरे आहेत. त्यामुळे विद्यार्थी बेस्ट प्रश्न सोडवतील, त्याचे मूल्यांकन करण्यात येईल. कमीत कमी २० प्रश्न सोडविण्याचे निश्चित आहे. अधिक प्रश्न सोडविल्यास विद्याथ्यार्ंना तसे गुण दिले जातील.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ. अमरावती विद्यापीठ.