गणेश वासनिक, अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला नवे शिलेदार मिळाले असून गत अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या अधिकारी पदाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी घेतलेल्या विविध पदांच्या मुलाखतीनंतर नवे कुलसचिव, परीक्षा व मूल्यांकन संचालक, वित्त व लेखाधिकारी आणि नवोपक्रम व साहचार्य मंडळ संचालकपदी नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
विद्यापीठ प्रशासनाचा कणा असलेल्या कुलसचिवपदी डॉ. अविनाश असनारे यांची वर्णी लागली आहे. डॉ. असनारे हे अगोदर विद्यापीठात शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालकपदी कार्यरत होते. डॉ. असनारे यांच्या रूपाने कुलसचिवपदी एक हसमुख, चौफेर व्यक्तिमत्त्व आणि दांडगा जनसंपर्क असलेली व्यक्ती मिळाली आहे. डॉ. नितीन कोळी यांच्याकडे नव्याने परीक्षा व मूल्यांकन संचालकपदाची जबाबदारी आली आहे. डॉ. कोळी यांनी यापूर्वी परीक्षा नियंत्रकपदाचा प्रभारदेखील सांभाळला आहे. हल्ली कोळी यांच्याकडे वित्त व लेखाधिकारी पदाचा प्रभार होता. वित्त व लेखाधिकारी म्हणून नागपूर येथील डॉ. पुष्कर देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. नवोपक्रम व साहचार्य मंडळ संचालकपदी अकोला येथील डॉ. अजय लाड यांची नियुक्ती करण्याचा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला आहे.