अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने मूल्यांकनाला गैरहजर असलेल्या सुमारे २०० विषय प्राध्यापकांना शो कॉज बजावल्या आहेत. परीक्षा विभागाच्या या कारवाईमुळे प्राध्यापक लॉबीत खळबळ उडाली असून, सात दिवसात नोटिशीला उत्तरे द्यावे लागणार आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार, अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२२ परीक्षांचे अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील १७७ केंद्रांवर परीक्षांचे नियोजन केले आहे. जूनपासून प्रारंभ झालेली ही परीक्षा १६ जुलै रोजी संपणार आहे. तत्पूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाने परीक्षांच्या मूल्यांकनाला वेग आणला आहे. एकंदर ६९७ परीक्षक पेपरचे मू्ल्याकंन करीत असले तरी २०० विषय प्राध्यापकांनी मूल्यांकनास उपस्थिती दर्शवली नाही. परिणामी गैरहजर असलेल्या विषय प्राध्यापकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
नोटीस बजावलेल्या प्राध्यापकांना सात दिवसात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. संबंधित विषय प्राध्यापकांचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास विद्यापीठ कायद्यान्वये वेतन कपात वा सेवापुस्तिकेत नोंद, अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मूल्यांकनास गैरहजर प्राध्यापकांचा विषय येत्या काळात विविध प्राधिकरणांकडे सुद्धा जाण्याची दाट शक्यता आहे. पुढील आठवड्यात अभियांत्रिकी निकाल जाहीर होण्याचे संकेत आहेत.
पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी, फॉर्मसीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. मूल्यांकनासही सुरुवात झाली आहे. मात्र, आतापर्यंत २०० विषय प्राध्यापकांनी मूल्यांकनास नकारघंटा दिली आहे. त्यामुळे संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या असून त्यांच्या प्राचार्यांना कळविण्यात आले आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ अमरावती विद्यापीठ.