अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दोन महिन्यात सलग दुसऱ्यांदा परीक्षांचे नियोजन केले असून, अभ्यास केव्हा, कसा करावा आणि परीक्षा कशाप्रकारे द्यावी, असा प्रश्न उपस्थित करीत शुक्रवारी विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात धडक दिली. परीक्षांच्या तारखात बदल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी करीत परीक्षा संचालक, कुलसचिवांकडे साकडे घालण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, विधी शाखेतील पहिल्या सत्राच्या परीक्षा २७ मार्च २०२३ रोजी संपन्न झाल्या आहे. त्यानंतर आता ६ जून रोजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा विचार न करता द्वितीय सत्राच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत.
नवलाची बाब म्हणजे विद्यापीठाच्या नियमानुसार दोन परीक्षा सत्रांमधील कालावधी हा निदान ९० दिवसाचा असणे बंधनकारक होते. तरी तो नियम मोडीत काढत विद्यापीठाने मर्जीनुसार परीक्षा जाहीर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर १५ ते ३० मे दरम्यान प्रथम सत्रातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे नियोजन केले आहे. आणि लगेच ५ दिवसाच्या अंतरावर द्वितीय सत्राच्या परीक्षा नियोजन केले आहे. यावर विधी शाखेतील एलएलबी ३ वर्ष व ५ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी १० मे रोजी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व परीक्षा नियंत्रक मोनाली तोटे यांच्या समक्ष निवेदन सादर केले असता विद्यार्थ्याचे म्हणणे न ऐकून घेता परीक्षा नियोजन बदलणार नाही. तुम्ही इथे कितीही निवेदन दिले तर फायदा नाही. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहे असे विधी शाखेतील विद्यार्थ्यांना खडसावले. सध्याचा विद्यापीठाचा तानाशाहीचा स्वभाव पाहता दिवंगत कुलगुरू दिलीप मालखेडे यांची आणि त्यांच्या लोकशाही कारभाराच्या पद्धतीची उणीव आज जाणवत असल्याची भावना विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पायऱ्यांवर निदर्शने करीत न्याय देण्याची मागणी रेटून धरली.