अमरावती :विद्यापीठाच्या जनरल फंडातून एक कोटीच्यावर अग्रीम घेऊन सेवामुक्तीच्या तारखेपर्यंत ही अग्रीम सादर न करणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेश बुरंगे यांच्यावर विद्यापीठाने विविध कलमानुसार गैरवर्तणुकीचा ठपका ठेवला असून त्यांना विद्यापीठ सेवेतून कार्यमुक्त करण्यास नकार दिला आहे. त्याअनुषंगाने कुलसचिवांनी पत्र निर्गमित केले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नियोजित कालावधी संपल्यानंतर रासेयो विभागाच्या संचालकांना कार्यरमुक्त न करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. जनरल फंडातून अग्रीम घेऊन खासगी कामाकरीता वापरायचा आणि आर्थिक वर्ष संपले तरी हिशेब जमा करायचा नाही, या अधिकाऱ्यांच्या वृत्तीला या कडक कारवाईमुळे चाप बसणार आहे. याबाबत ‘लोकमत’ ने ३ सप्टेबर रोजी ‘ विद्यापीठाच्या जनरल फंडाला पाय फुटले, ‘त्या’ एक कोटीचा हिशेब जुळेना’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून हे प्रकरण उघडकीस आणले होते. आता डॉ. राजेश बुरंगे यांची टर्म संपत असल्याने हिशेबाचे काय होणार? असा प्रश्नही उपस्थित केला होता.
अधिकार काढले, कार्यमुक्त नाही
डॉ. राजेश बुरंगे यांच्यावर गैरवर्तणूकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ आणि जबाबदार पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडून अशा प्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा नाही असे नमूद करून त्यांची वर्तणूक भंग करणारी आहे, असे कुलसचिवांनी आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे बुरंगे यांना कार्यमुक्त न करता त्यांचा कार्यभार काढला असून विद्यार्थी विकासचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांच्याकडे नव्याने कार्यभार सोपविला आहे. वित्त विभागाच्या बारा स्मरणपत्रांना बुरंगेनी दाद न दिल्याने कुलसचिवांनी ही कडक कारवाई केल्याचे बोलले जात असून त्यांच्यावरील शिस्तभंगाच्या कार्यवाहीचे पत्राची प्रत बुरंगेच्या शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयांना पाठविली आहे.
अग्रीम संदर्भात ८ ते ९ फाईल्स प्राप्त झाल्या आहेत. रासेयो संचालक डॉ. बुरंगे यांच्याकडे शिल्लक असलेला हिशेब आल्याशिवाय कार्यमुक्त करू नये, असे पत्र निर्गमित करण्यात आले आहे. नियमानुसार कार्यवाही केली जाईल.
- डॉ. तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ.