अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा प्रचार तापला असून, रविवार, २० नोव्हेबर रोजी मतदान प्रकिया राबविली जाणार आहे. नुटा, शिक्षण मंच, अभाविप, जस्टीस, शिवसेना, प्राचार्य फोरम पॅनलसह अपक्ष उमेदवारांची गर्दी आहे. यंदा एकूण २०६ उमेदवार रिंगणात आहे.
अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळ निवडणुकीसाठी अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ येथे ६३ मतदान केंद्र असणार आहे. एकूण सिनेटच्या ३७ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. उच्च शिक्षणक्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाची निवडणूक म्हणून सिनेट मानली जाते. नुटा आणि शिक्षण मंच हे परंपरागत प्रतिस्पर्धी यंदाही आमने-सामने उभे ठाकले आहे. यापूर्वी सिनेटच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
नामांकन मागे घेतल्यानंतर आता ३७ सिनेट सदस्य निवडीसाठी एससी, एसटी, डीटी/एनटी, ओबीसी संवर्गासह महिला, सर्वसाधारण असे आरक्षण असणार आहे. रविवार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. यंदा येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे महाविद्यालयीन संस्था चालकांचे प्रतिनिधीसाठी सिनेटची निवडणूक लढवित असल्याने ती हाय व्होल्टेज ठरत आहे. एकंदरीत नुटाविरुद्ध शिक्षण मंच अशी लढत होण्याचे चित्र आहे. प्राचार्य फोरमचाही दबदबा असून, नव्याने जस्टिस पॅनलच्या एन्ट्रीने रंगत आली आहे.
अशी होणार सिनेटमध्ये निवड
- महाविद्यालयीन प्राचार्य : १०
- विद्या परिषद : ०६
- अभ्यास मंडळ विद्याशाखानिहाय प्रत्येकी विभाग प्रमुख : ३
२२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी
२२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून विद्यापीठ परिसरात मतमोजणी होणार आहे. आठ गटांची निवड करण्यात आली आहे. कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्या नियंत्रणाखाली मतदान व मतमोजणीचे कार्य होणार आहे.
मतदानासाठी 'हे' आवश्यक
अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ निवडणुकीमध्ये मतदानासाठी ओळखपत्र अनिवार्य आहे. मतदानासाठी निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पारपत्र, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कुठलेही एक फोटो असलेले दस्तावेज आवश्यक असणार आहे.
अशी आहे मतदार संख्या
- पदवीधर मतदार : ३५,६५९
- महाविद्यालयीन शिक्षक : ३४१३
- व्यवस्थापनाचे प्रतिनिधी : २३९
- प्राचार्य : ११९
- विद्यापीठ शिक्षक : ५९
- अभ्यास मंडळ सर्व विद्याशाखा : १०५५