अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा - २०२२ ऑफलाईन घेण्यासाठी तयारी चालविली आहे. १ जून ते १५ जुलै या दरम्यान परीक्षांचे नियोजन असणार आहे. मात्र, एकंदरीत ३५०० विषयांसाठी किमान साडेतीन लाख नमुना प्रश्नपेढी तयार करण्याचे लक्ष्य आहे. साधारणत: १० मे पर्यंत प्रश्नपेढीचे काम पूर्णत्वास जाईल, असे परीक्षा विभागाने ठरविले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरूंसोबत २५ एप्रिलला आभासी पद्धतीने घेतलेल्या बैठकीत महाविद्यालय, विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन नियोजनाबाबत शिक्कामोर्तब केले. त्याअनुषंगाने अमरावती विद्यापीठाने कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या मार्गदर्शनात परीक्षांंची तयारी चालविली आहे.
पहिल्या टप्प्यात उन्हाळी २०२२ परीक्षेसाठी नमुना प्रश्नपेढी तयार करण्यासाठी २९ एप्रिलला प्राचार्य, विषय प्राध्यापकांनी आभासी बैठक झाली. यात विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव विज्ञान आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखांच्या अभ्यासक्रमानुसार विद्यापीठीय वर्णनात्मक परीक्षांचे प्रश्नपेढी तयार केली जाणार आहे. प्रश्नपेढी तयार करण्यासाठी विशिष्ट फाॅर्मेट असून, महाविद्यालयांना पाठविण्यात आला आहे.
अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमात झाला बदल
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठअंतर्गत अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमात बदल झालेला आहे. त्यामुळे उन्हाळी २०२२ परीक्षांमध्ये तशी प्रश्नपेढी तयार करण्यात येणार आहे. कुलगुरूंच्या अध्यक्षेत शुक्रवारी अभियांत्रिकी, तांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची बैठक आटोपली. यात शाखानिहाय विषयांची नमुना प्रश्नपेढी तयार करण्यावर एकमत झाले. सत्रनिहाय, शाखानिहाय प्रश्नपेढी तयार करण्यात येणार आहे.
ऑफलाईन परीक्षा घेण्याविषयी तयारी सुरू झाली आहे. अभ्यासक्रमिकेमध्ये असलेले सर्व ओपन ईफेक्टिव्ह व प्रोफेशनल ईफेक्टिव्ह विषयांची प्रश्नपेढी संबंधित शाखानिहाय महाविद्यालयांकडे साेपविली आहे. १० मेपर्यंत प्रश्नपेढीचे काम पूर्ण होईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.