लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती दर्शविली जात असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. वेबसाईट 'अपडेट' नसल्याने अचूक माहिती मिळविताना अनेकांचा गोंधळ उडत आहे.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी कारभार स्वीकारल्यानंतर बरेच आमूलाग्र बदल घडविणारे निर्णय घेतले आहे. रोजगाराभिमुख शिक्षण, मेळघाटातील विद्यार्थ्यांना एलईडी दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण, व्यवसाय अनुकूल शॉर्टटर्म अभ्यासक्रम, परीक्षा विभागाचे आॅनलाईन कामकाज, एका क्लिकवर विद्यापीठाची माहिती, लॉकर्स प्रणालीने शैक्षणिक कागदपत्रे अशा एक ना अनेक योजना, उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवून कुलगुरुंनी विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली आत्मसात केली आहे. परंतु देश, विदेशात संकेतस्थळावरून एका क्लिकवर विद्यापीठाची माहिती घ्यायची असल्यास ती चुकीची मिळेल, यात दुमत नाही. कारण अद्यापही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती आहे. विशेषत: विद्यापीठाच्या शिक्षण विभागात गणित विभागाचे प्राध्यापक तथा विभागप्रमुख किशोर अढाऊ हे सेवानिवृत्त झाले असताना तेच विभागप्रमुख असल्याची नोंद आहे. कुलगुरुंचे स्वीय सहायक एम.एस.पोटे हेसुद्धा सेवानिवृत्त झाले असून त्यांचे नाव आजही कायम आहे. प्र-कुलगुरुपदी राजेश जयपूरकर हे रुजू झाले असताना त्यांचे नाव संकेत स्थळावर नाही. बीसीयूडी कॉलेज विभागाचे अशोक चव्हाण सेवानिवृत्त झाले आहेत, तरीदेखील त्यांचे नावाची नोंद आहे. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव, सहायक कुलसचिवांचे नावांची नोंद नाहीत. लेखा व वित्त विभागात सहायक कुलसचिव निमजे हे असताना त्यांच्या नावांची नोंद नाही. सामान्य प्रशासन विभागाचे उपकुलसचिव प्रवीण राठोड हे असूनही त्यांचे छायाचित्र नाही. विद्यापीठात सुरक्षा अधिकारी कोण? हे दिसत नाही. विद्यार्थी कल्याण विभागात गणेश मालटे आजही कायम असल्याचे दर्शविले जात आहे. अभियांत्रिकी विभागात शशीकांत रोडे हे कार्यकारी अभिंयता असताना त्यांच्या नावे विद्यापीठ अभियंता असे दर्शविले जात असून त्यांचे छायाचित्रही नाही. भांडार विभागातील सहायक कुलसचिवांचे छायाचित्र, हिंदी विभागप्रमुख म्हणून शंकर बुंदिले हे कायम आहेत. बहुतांश विभागातील अधिकाºयांचे प्रोफाईल, मोबाईल क्रमांक, ई-मेल दर्शविण्यात आले नाहीत. प्रौढ निरंतर शिक्षण व विस्तार सेवा विभागाच्या नावात बदल झाला असताना ‘जैसे थे’ आहे. अत्याधुनिक, प्रगत तंत्रज्ञानाची कास धरणाºया संत गाडगेबाबांच्या नावाने असलेल्या अमरावती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जुनी आणि कालबाह्य माहिती दर्शविली जात असले तर कारभार कसा सुरू आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असा सूर उमटू लागला आहे.संगणक विभाग करतो तरी काय ?विद्यापीठाच्या संगणक विभागात प्रचंड मोठा फौजफाटा असताना संकेतस्थळावर अचूक माहिती असू नये, ही बाब संगणक विभागासाठी लाजीरवाणी ठरणारी आहे. विद्यापीठाच्या काही विभागात नियम, कायदे गुंडाळून कारभार चालत असल्याचे यावरुन सिद्ध होते, हे विशेष.
अमरावती विद्यापीठाचे संकेतस्थळ 'अपडेट' नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 11:09 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती दर्शविली जात असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
ठळक मुद्देकारभारावर प्रश्नचिन्ह : सेवानिवृत्त अधिकारी पदावर असल्याची नोंद