- गणेश वासनिक
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३४ व्या दीक्षांत समारंभात इतिहासाचे सोनेरी पान लिहिले जाणार आहे. विद्यापीठातील सर्वोच्च पदवी डी.लिट. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील श्री. गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांना बहाल केली जाणार आहे. संशोधनाच्या माध्यमातून डी.लिट. मिळविणारे ते विद्यापीठातील पहिले अभ्यासक आहेत.डॉ. संतोष ठाकरे यांनी ‘महानुभाव पंथ नव्हे एक दर्शन’ यावर शोधप्रबंध सादर केला असून, विद्यापीठाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आस्तिक-नास्तिक, ईश्वरवादी- निश्वरवादी, आत्मवादी-अनात्मवादी या दर्शनामध्ये वंश, सांख्य, वेदांत दर्शन व उपनिषेध, चर्वाक्, बौद्ध, जैन तत्त्वज्ञानात जगाची निर्मिती व भूमिका मांडली. मानवी जीवनाचा अन्वयार्थ लावला. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी जगाच्या निर्मितीविषयी आपली भूमिका मांडली, तिच्या उत्पत्तीविषयीचे स्वतंत्र मत मांडले. त्यामुळे महानुभाव दर्शनाला तत्त्वज्ञानाचा दर्जा दिला गेला पाहिजे, यासाठी डॉ. ठाकरे यांनी संशोधन केले. सृष्टीकडे, मानवी जीवनाकडे पाहण्याचा यात विचार करण्यात आला आहे. याहून वेगळा विचार चक्रधर स्वामींनी मांडला, म्हणून इतर भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे महानुभावपंथ हा केवळ पूजा-अर्चा नसून तेसुद्धा एक दर्शन आहे, हा विचार संशोधनातून अभ्यासकांसमोर मांडला. यापूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गानसम्राज्ञी आशा भोसले यांना मानद डी.लिट. पदवी बहाल करून गौरविले आहे. मात्र, तत्त्वज्ञानावर डी.लिट. मिळवणारे डॉ. संतोष ठाकरे हे राज्यातील पहिले संशोधक ठरले. यापूर्वी पश्चिम बंगाल येथील डॉ. ज्वालाप्रसाद यांना इंग्लड विद्यापीठाने डी.लिट. बहाल केली होती.
भारतीय दर्शनशास्त्रात स्थानडॉ.संतोष ठाकरे यांच्या संशोधनामुळे महानुभाव विचारधारेला भारतीय दर्शनात महत्त्वाचे स्थान प्राप्त होणार आहे. आतापर्यंत महानुभाव पंथातील साहित्याचा अभ्यास झालेला आहे. परंतु, महानुभाव तत्त्वज्ञानापासून अभ्यासक अनभिज्ञ होते. महानुभाव हा केवळ पंथ किंवा साहित्य संपदा नसून, ते दर्शन आहे, हे डॉ. ठाकरे यांनी सिद्ध केले. त्यामुळे आता तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांना महानुभाव दर्शनाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
अशी होते डी.लिट. संशोधनाची निवडविद्यापीठात डी.लिट. संशोधनासाठी प्रबंध सादर झाल्यानंतर कुलगुरू ते नामित करतात. हा विषय अचूक असल्यास न फेटाळता तो तज्ज्ञांकडे पाठविला जातो. अभ्यासक, तज्ज्ञांनी या विषयावर चिंतन, मंथन केल्यानंतर त्यात काही नवीन आहे अथवा नाही? याचा शोध घेतला जातो. त्यानंतर याबाबत तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त होतो. प्रबंध स्वीकारण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट होते. पुन्हा तो दोन तज्ज्ञांकडे पाठविला जातो. तज्ज्ञ पूर्णत: समाधानी असल्यास त्या संशोधन प्रबंधात कुठलीही सुधारणा नसावी. त्यानंतर परीक्षा मंडळ, अॅकेडमिक आणि व्यवस्थापन परिषदेने एकमताने मान्यता दिल्यानंतर त्यावर कोणतेही आक्षेप न राहता त्या संशोधनास डी.लिट पदवी देण्याचे शिक्कामोर्तब होते.विद्यापीठात यापूर्वी डी.लिट. पदवीसाठी ४ ते ५ संशोधकांनी प्रबंध सादर केले होते. मात्र, ते संशोधनात्मक नसल्याने तज्ज्ञांनी फेटाळले. डॉ. संतोष ठाकरे यांच्या ‘महानुभाव पंथ नव्हे एक दर्शन’ याला सर्वार्थाने मान्यता मिळाली आहे. २३ फेब्रुवारी रोजी दीक्षांत समारंभात त्यांना डी.लिट. बहाल केली जाईल.- जयंत वडते, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ