अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला सोमवारी थाटात प्रारंभ झाला. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेने यजमानपद स्वीकारलेल्या येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात चार दिवस चालणाऱ्या या युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
युवा महोत्सवात लोकनृत्य, समूहगान, एकांकिका, कोलाज, वाद्यसंगीत, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धेची मांदियाळी असणार आहे. त्याकरिता पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले की, देशाच्या जडणघडणीत युवकांचे सामाजिक उत्तरदायित्व महत्त्वाचे असून, युवकांनी समाजनिर्मितीसाठी पुढे येऊन कर्तव्य पार पाडावे. युवा महोत्सव हे युवकांच्या कला, गुणांना न्याय देणारे हक्काचे व्यासपीठ आहे. विद्यार्थी दशेत युवा महोत्सवात सहभागी होणाºया प्रत्येक युवकांना ही आठवण चिरकाल स्मरण राहील.
युवकांची ऊर्जा सकारात्मक वळणे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जीवनात ध्येय गाठण्यासाठी शॉॅर्टकट न शोधता परिश्रम, जिद्द, कष्ट करण्याची आकांक्षा बाळगा. तेव्हा यश तुम्हाला मिळेल, असे नवाल म्हणाले. तसेच पौर्णिमा दिवसे आणि त्यांच्या चमुने सादर केलेल्या विद्यापीठ गीताने युवा महोत्सवाची सुरूवात झाली. पाहुण्यांचे स्वागत ग्रामगीता देऊन करण्यात आले. गतवर्षीच्या उत्कृष्ट युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत किशोर देशमुख यांचा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक सुधीर मोहोड, संचालन मंजूषा वाठ, आभार प्रदर्शन विनोद गावंडे यांनी केले.
युवा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी कुलगुरू राजेश जयपूरकर याच्यासह प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप खेडकर, प्रफुल्ल गवई, दिनेश निचित, कुलसचिव तुषार देशमुख, व्हीएमव्ही संस्थेचे संचालक वसंत हेलावी (रेड्डी), विद्यार्थी विकास संचालक दिनेश सातंगे, सिनेट सदस्य मनीष गवई, रासेयो संचालक राजेश बुरंगे, युवा महोत्सव समन्वयक सुधीर मोहोड, विनोद गावंडे, राजीव बोरकर, कमल भोंडे, जयश्री वैष्णव, रेखा मग्गीरवार आदी उपस्थित होते.