अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुरुवार, २२ ऑक्टोबरपासूनच्या नियोजित परीक्षा पुढील निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चौथ्यांदा परीक्षा स्थगितीचा प्रंसग विद्यापीठावर ओढवला आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थी या प्रकारामुळे निराश झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन विद्यापीठाने ठरविले होते. प्रारंभी १ ऑक्टोबर, नंतर १२ पुन्हा २० ऑक्टोबर अशा तीनदा परीक्षा विविध कारणांनी स्थगित करण्यात आल्या. मात्र, २२ ऑक्टोबरपासून नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येतील, असे परिपत्रक २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी काढले. त्यानुसार बुधवारी दिवसभर ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षेत येणा-या तांत्रिक अडचणी, समस्यांवर मंथन सुरूच होते. परंतु, ऑनलाईन परीक्षेसाठी नेमलेल्या नागपूर येथील ‘प्रोमार्क’ एजन्सीकडून त्याअनुषंगाने प्रतिसाद मिळाला नाही.
परिणामी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी गुरुवारपासूनच्या नियोजित परीक्षा पुढील निर्णयापर्यंत स्थगित केल्या आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत नव्याने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती आहे. वाणिज्य व व्यस्थापन, मानव्यविज्ञानशास्त्र, आंतरविद्याशाखा विद्याशाखीय अभ्यास आणि विज्ञान व तंत्रज्ञान अशा चारही विद्याशाखांच्या परीक्षांना फटका बसला आहे. उन्हाळी २०२० परीक्षेत १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, तांत्रिक समस्यांचे संकट कायम असल्याने विद्यापीठाला परीक्षा स्थगित करण्याचा प्रसंग ओढवला आहे.
विद्यार्थीही वैतागले....कोरोना काळात घरी असलेल्या विद्यार्थ्यांनी जेमतेम उन्हाळी २०२० परीक्षेला सामोरे जाण्याची मानसिकता तयार केली. १ ऑक्टोबरपासून सुरळीत परीक्षा होणार, यासाठी विद्यार्थ्यांसह पालकही आनंदीत असल्याचे चित्र होते. मात्र, परीक्षांच्या ‘तारीख पे तारीख’ने विद्यार्थी वैतागले आहे. २० ऑक्टोबर रोजी ऑनलाईन परीक्षेत उडालेला गोंधळाने विद्यार्थी हतबल झाले आहे. तांत्रिक समस्या कधी सुटणार आणि परीक्षेपासून कधी मुक्त होऊ, या विवंचनेत विद्यार्थी आहेत.
परीक्षेच्या अनुषंगाने बुधवारी तांत्रिक समस्या कायम होत्या. परीक्षांच्या नियोजनाबाबत समितीचे गठन होईल. आता तांत्रिक समस्या दूर केल्यानंतरच परीक्षांचा तारीख जाहीर करू.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरु, संत गाडेगबाबा अमरावती विद्यापीठ