जितेंद्र दखने, अमरावती : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऐतिहासिक गावांतील शाळा राज्य शासनाकडून विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये राज्यातील १३ शाळांचा समावेश आहे. यात विदर्भामधून केवळ अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तीन शाळांचा समावेश आहे. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जिल्हा परिषद शाळा (मुलींची) मोझरी, संत गाडगे बाबा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडगाव आणि शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापळ अशा जिल्हा परिषदेच्या तीन शाळा डिजिटल होणार आहेत. त्याकरिता राज्य शासनाने सुमारे दोन कोटी ७७ लाख ४४ हजार निधी उपलब्ध करून दिला आहे.
राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महापुरुषांशी संबंधित दहा ऐतिहासिक गावांतील व आमदारांच्या मागणीनुसार तीन यात तीन ऐतिहासिक गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यानुसार यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तीन जिल्हा परिषद शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे. याकरिता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात १४ कोटी ३० लाखांचा निधी जाहीर केला आहे. यामधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा परिषद शाळा (मुलींची) मोझरी (तिवसा), संत गाडगेबाबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडगाव (अंजनगाव सुर्जी) आणि शिक्षण महर्षी, कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख जिल्हा परिषद शाळा पापळ (नांदगाव खंडेश्वर) या शाळा आयडॉल केल्या जाणार आहेत. यामुळे अमरावती जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षितिजावर आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.या संकल्पनावर भर
या शाळेत त्या महापुरुषांना इतिहास व विचार सांगणारे भव्य संग्रहालय स्वतंत्र व प्रशस्त, सुख सोयींनीयुक्त इमारत होणार ऐतिहासिक संकल्पना राबवणार शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व्यापक प्रयत्न.
पर्यटनात पडणार भर
या शाळांमध्ये महापुरुषांचा इतिहास आणि विचार सांगणारे संग्रहालय असणार आहे. या शाळांचा विकास सुमारे २ कोटी ७७ लाख ४४ हजार रूपयाच्या निधीतून केला जाणार आहे. त्यामुळे या तीन शाळांचे भाग्य उजळणार आहे. या शाळांचा विकास झाल्यास जिल्ह्यातील पर्यटनात भर पडणार आहे.