अमरावती : अमरावती शहर हे जातीय एकता, सामाजिक सलोख्याचे केंद्र असताना आता काही प्रवृतींकडून जातीय दंगली, जाळपोळ, हत्याकांड अशा घटनांना वाव दिला जात आहे. मात्र, अमरावतीला दहशतवादाची प्रयोगशाळा कधीच होऊ देणार नाही, यात माझे प्राण गेले तरी चालेल, असा आक्रमक पवित्रा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे घेतला. काॅंग्रेस पक्षातर्फे येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषेदत त्या बोलत होत्या.
ॲड. ठाकूर यांच्या मते, राजस्थानच्या उदयपूर येथील घटनेतील आरोपी मोहम्मद रियाज हा भाजपचा कार्यकर्ता असून, अमरावती येथील इरफान खान हा मुख्य सूत्रधार खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या जवळील आहे. त्यामुळे दहशतवादी प्रवृत्तीला कोण सहकार्य करते, हे स्पष्ट होते. उमेश कोल्हे यांची हत्या ही घटना अतिशय दुर्देवी बाब आहे. मात्र, खासदार, आमदार राणा दाम्पत्याने कोल्हे यांच्या मृत्यूचा इव्हेंट म्हणून वापर केला, असा घणाघात ॲड. यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर केला.
२१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या होते आणि २८ जून रोजी उदयपूर येथे कन्हैयालाल शर्मा यांना ठार मारले जाते. परंतु, खासदार नवनीत राणा यांनी २७ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उदयपूर व अमरावती येथील हत्याकांडाच्या घटनेत साम्य असल्याने एनआयए अथवा सीबीआयमार्फत कोल्हे यांच्या हत्येची चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र दिले होते. त्यामुळे उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या होणार, ही माहिती खासदार नवनीत राणा यांना एक दिवस अगोदरच म्हणजे २७ जून २०२२ रोजी कशी व कोठून मिळाली, याचा शोध केंद्रीय यंत्रणांनी घ्यावा, अशी मागणी ॲड. यशाेमती ठाकूर यांनी केली. त्यामुळे अमरावतीला दहशतवादाची प्रयोगशाळा करावी आणि मतांच्या ध्रुवीकरणामागे भाजप वा त्यांच्या सहयोगी मित्रांचे कारस्थान तर नाही ना, अशी शंकाही ॲड. ठाकूर यांनी उपस्थित केली.