अमरावती : पोषण अभियान अंतर्गत जनआंदोलन या उपक्रमामध्ये अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने उत्कृष्ट कार्य केले. यात राज्यात जिल्हा परिषदेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यासंबंधी पुरस्काराचे वितरण ६ मार्च रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येथील जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी हा पुरस्कार विभागातर्फे स्वीकारला. यावेळी कार्यक्रमाला महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. एम. कुंदन व आयुक्त इंद्रा मालो व इतर गणमान्य महिला उपस्थित होत्या.
२०२९-२० या वर्षात संपूर्ण भारतभर पोषण अभियानाअंतर्गत जनआंदोलन हा उपक्रम राबवण्यात आला होता. सदर उपक्रमांमध्ये पोषण विषयाशी संबंधित विविध कार्यक्रम, रॅली, गृहभेट आदी उपक्रमांमधून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोषणाबाबत जनजागृती करणे अभिप्रेत होते. या उपक्रमातून अमरावती जिल्ह्याने महाराष्ट्रात सर्वात जास्त कार्यक्रमांची नोंद केल्याने जिल्ह्याला हा बहुमान प्राप्त झालेला आहे. सोबतच उत्कृष्ट प्रकल्प या संवर्गातून अमरावती जिल्ह्यातील वरूड या प्रकल्पाने राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला.
महिला व बाल कल्याण विभागातील सीएएसचे जिल्हा समन्वयक शिवानंद वासनकर यांनी महाराष्ट्रातील उत्कृष्ट जिल्हा समन्वयक हा बहुमान पटकाविला. जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्या एकत्रित परिश्रमातून या कामगिरीची नोंद झालेली आहे.