लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अंतर्गत नोंदणी होणाऱ्या चारचाकी वाहने तसेच दुचाकी वाहनांच्या फॅन्सी नंबरसाठी लाखोंचे दर आहेत. दोन अमरावतीकरांनी प्रत्येकी ४५ हजार रुपये मोजून ९५९५ व ३२३२ या क्रमांकाला पसंती दर्शविली. ०००१ या क्रमांकाचे सर्वाधिक तीन लाख रुपये दर ठरविण्यात आले आहे. ०००९ या क्रमांकासाठी दीड लाख मोजावे लागतात. या क्रमांकांसाठी कुणीही रक्कम भरण्याची तयारी दर्शविली नसली तरी ५ हजारांपासून ४५ हजारांपर्यंत रक्कम मोजून फॅन्सी नंबर मिळविणारे अनेक आहेत. २०१९ मध्ये फॅन्सी क्रमांकातून आरटीओला ३५ वाहनातून २ लाख ७३ हजारांचा महसूल मिळाल होता, तर १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२० दरम्यान आठ महिन्यात ४०२ वाहनांच्या क्रमांकातून आरटीओला तब्बल ३४ लाख ८४ हजारांचा महसूल मिळाला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी यांनी दिली.
गतवर्षी फॅन्सी क्रमांकाची फारशी मागणी नव्हती. यंदा लॉकडाऊननंतर नागरिकांनी वाहनांची रेकॉर्डब्रेक खरेदी केली. फॅन्सी नंबरमधून आरटीओला आठ महिन्यात ३४ लाख ८४ हजारांचा महसूल मिळाला. नवीन वर्षात फॅन्सी नंबरचे दर आणखीन वाढणार आहेत. राज बागरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती
०७८६ ला पसंती ०७८६ या क्रमांकालासुद्धा आरटीओमध्ये मागणी आहे. चारचाकीपेक्षा दुचाकीकरिता हा क्रमांक नागरिकांनी मिळविला. हा फ़ॅन्सी क्रमांक दुचाकीकरिता २० हजार रुपयांत विकला गेला, तर चारचाकीकरिता दीड लाख मोजावे लागत होते. ज्या क्रमांकाची बेरीज ही २१ होते, अशा क्रमांकांना सर्वाधिक मागणी असल्याचे येथील एका अधिकाऱ्याने सांगितले.