वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या ११ महिन्यांतील ३३४ दिवसांमध्ये १५९ घरफोड्या व ७९६ चोऱ्या झाल्या आहेत. यामध्ये अमरावतीकरांची तब्बल चार कोटींची संपत्ती चोरांनी लंपास केली. पोलिसांनी अटक केलेल्या चोरांकडून केवळ ६९ लाख ९५ हजार ८७४ रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा घरफोडी व चोरीचे गुन्हे वाढले आहेत, तर गुन्ह्यांचा छडा लावण्याचे व संपत्ती जप्तीचे प्रमाण कमी असल्याचे पोलिसांच्या लेखाजोख्यावरून दिसून येत आहे.अमरावती शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या संपत्तीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत शहरात १३९ घरफोडी व ७९९ चोऱ्या झाल्या, तर १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत १५९ घरफोडी व ७९६ चोऱ्या झाल्या आहेत. त्याची तुलना केली असता, यंदा २० घरफोड्या व तीन चोरीच्या घटना वाढल्या. या दोन्ही वर्षांच्या आकडेवारीत मोठी तफावत नाही, मात्र, नागरिकांची कोट्यवधींची संपत्ती चोरून नेल्याचे दिसून येत आहे.नोव्हेंबर २०१८ पर्यंत घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये २ कोटी ८९ लाख ७९ हजार ७१८ रुपयांच्या संपत्तीपैकी पोलिसांनी ५० लाख ६८ हजार ५५९ रुपयांची संपत्ती जप्त केली. यंदा नोव्हेंबर २०१९ पर्यंत ४ कोटी १३ लाख १८ हजार ९०५ रुपयांच्या संपत्तीपैकी पोलिसांनी ६९ लाख ९५ हजार ८७४ रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. दोन्ही वर्षांत चोरट्यांनी चोरून नेलेली कोट्यवधीची संपत्ती जप्त करण्यात अमरावती शहर पोलिसांना यश मिळाले नसल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.गेल्या वर्षांच्या तुलनेत घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात थोडीशी वाढ झाली आहे. या गुन्हेगारांची टोळी निष्पन्न करण्याचे प्रयत्न सुरु आहे. दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात आरोपींचे अटकसत्रही सुरु आहे.- संजयकुमार बाविस्करपोलीस आयुक्तजबरी चोरी झाली कमी२०१८ मध्ये नोव्हेंबरपर्यंत जबरी चोरीच्या ७३ घटना घडल्या. लुटमार करणाऱ्यांनी तब्बल ३२ लाखांची संपत्ती जबरीने चोरून नेली होती. पोलिसांनी सहा गुन्हे उघड करून आरोपींकडून ९ लाख ५८ हजार रुपयांची संपत्ती जप्त केली. २०१९ मध्ये ५८ घटना घडल्या असून, २२ लाख ४० हजारांची संपत्ती लुटली. पोलिसांनी एका गुन्ह्याचा छडा लावून ५ लाख ४० हजारांची संपत्ती जप्त केली. २०१८ मधील गुन्ह्याच्या तुलनेत यंदा १५ गुन्हे कमी घडले आहेत.दुचाकीचोरीचे ३३७ गुन्हेशहरात दुचाकीचोरांनी धुमाकूळ घातला आहे. नोव्हेंबर २०१९ पर्यंत चोरांनी शहरातील ३३७ दुचाकी चोरून नेल्या आहेत. यापैकी केवळ ६७ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले. २०१८ मध्ये २७५ गुन्ह्यांपैकी ५८ गुन्हे पोलिसांनी उघड केले होते.दरोड्याचे गुन्हे वाढलेनोव्हेंबर २०१८ पर्यंत शहरात दोन दरोडे पडले होते, तर यंदा दरोड्याच्या पाच घटना घडल्या. याशिवात दरोड्याच्या प्रयत्नाचे २०१८ मध्ये तीन गुन्हे घडले. २०१९ मध्ये एक गुन्हा घडला आहे.मोबाइल चोरीचे गुन्हे घटले२०१८ तील ११ महिन्यांत शहरात तब्बल १०६ मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांच्या नोंदी झाल्या, तर २०१९ मधील ११ महिन्यात केवळ ४६ गुन्हे नोंदविले गेले. दोन्ही वर्षांची तुलना केली असता, यंदा ६० गुन्हे कमी झाले आहेत.११ महिन्यांत सहा चेनस्नॅचिंगनोव्हेंबर २०१८ पर्यंत शहरात २१ मंगळसूत्र हिसकावून नेल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा या गुन्ह्यांत प्रचंड घट झाली असल्याची आकडेवारी पुढे आली.
३३४ दिवसांत अमरावतीकरांची उडवली चार कोटींची संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 6:00 AM
अमरावती शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या संपत्तीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत शहरात १३९ घरफोडी व ७९९ चोऱ्या झाल्या, तर १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत १५९ घरफोडी व ७९६ चोऱ्या झाल्या आहेत. त्याची तुलना केली असता, यंदा २० घरफोड्या व तीन चोरीच्या घटना वाढल्या.
ठळक मुद्दे७० लाखच रिकव्हर । १५९ घरफोडी, चोरीच्या ७९६ घटना