अमरावती : येथील ‘मणिपूर’ ले-आऊटमध्ये तब्बल १४ तासांच्या थरारनंतर बिबट्याने बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास नजीकच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरात धूम ठोकली. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात त्याचा मुक्काम असून, गुरूवारी याच भागात विष्ठा देखील आढळली आहे. त्याअनुषंगाने वन कर्मचाऱ्यांची शोधमोहीम निरंतरपणे सुरू आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजदेखील तपासण्यात आले.
गत महिनाभरापासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, शासकीय पाठ्यपुस्तक परिसरात तळ ठोकून असलेला बिबट्याचा बुधवारी अमरावतीकरांनी थरार अनुभवला. मणिपूर’ ले-आऊटमध्ये अतिशय दाट झाडी-झुडपे असल्याने त्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करता आले नाही. बुधवारी रात्री १२ वाजतापर्यंत व्हिएमव्हीच्या मागील रस्ता दोन्ही बाजुने बॅरिकेट्सने वेढला होता. या मार्गावरील वाहनांची जे-जा देखील बंद करण्यात आली. मात्र, दिवसभर सैरभैर आणि नागरिकांच्या आरडाओरडाने भेदरलेला बिबट हा मणिपूर’ ले-आऊटमध्ये दडून बसला होता.
दरम्यान या परिसरातील झाडे, झुडपे बुलडोजरने साफ करीत असताना तो यंत्रणेला चकमा देवून गुरुवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास भिंत ओलांडून व्हीएमव्हीच्या परिसरात गेल्याचे वन विभागाने सांगितले. मात्र, व्हिएमव्हीच्या परिसरात आता बिबट असल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थी प्रचंड दहशतीत आले आहेत. दरम्यान सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, आरएफओ वर्षा हरणे, रेस्क्यू पथकाचे आरएफओ प्रभाकर वानखडे यांच्यासकह रेस्क्यू पथक आणि वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेतला, हे विशेष.
प्री-आयएएस पूर्व प्रशिक्षण केंद्रातील सीसीटीव्हीची तपासणीशासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातील प्री-आयएएस पृूर्व प्रशिक्षण केंद्रात बुधवारी रात्री १०.३० ते पहाटे ४ वाजतापर्यत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. मात्र, या दरम्यान बिबट्याच्या कोणत्याही हालचाली कैद झाल्याचे दिसून आल्या नाहीत. या केंद्रातील आतील भाग, मुख्य रस्ता, काही घनदाट झाडी, झुडपांचाही सीसीटीव्हीद्वारे मागोवा घेण्यात आला.