अमरावती : येथील एका ३६ वर्षीय तरुणाने ठाणे जिल्ह्यातील खडवली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी २५ जूनला उशिरा रात्री मृताच्या पत्नीसह तिच्या तीन नातेवाइकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. महेश रमेश ताथोडे (३६, रा. हरिशांती अपार्टमेंट, साईनगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पंकज दांडगे (४०), जानराव टिकले (६०) यांच्यासह दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, महेश ताथोडे हा आई-वडिलासह हरिशांती अपार्टमेंट येथे राहत होता. २०२२ मध्ये महेशचे जानराव तिकडे यांच्या मुलीशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोन महिने महेशची पत्नी व्यवस्थित राहिली. त्यानंतर ती नेहमी मोठ्या बहिणीकडे जात होती तसेच सतत फोनवर बोलत होती. त्यामुळे महेशने तिला विचारपूस केली असता, तिने महेश व त्याच्या आई-वडिलांसोबत वाद घातला होता. या कारणाने महेश तणावात होता.
सांगून गेला, आलाच नाही
पत्नीच्या वागण्याबाबत महेशने पत्नीची बहीण तसेच तिच्या वडिलांना सांगितले असता, त्यांनी महेशला हातपाय तोडण्याची धमकी दिली. तेव्हापासून ती त्याच्यासोबत व्यवस्थित राहत नव्हती. २९ एप्रिल २०२३ रोजी रूपाली सकाळी बहिणीच्या घरी गेली. मात्र सायंकाळपर्यंत परत न आल्यामुळे महेशने तिला फोन केला. परंतु, तिने येण्यास नकार दिला. ३० एप्रिल रोजी सायंकाळी महेश घरातून निघून गेला. मात्र, १ मे रोजीसुद्धा तो घरी परत न आल्यामुळे रमेश ताथोडे यांनी बडनेरा पोलिसात तो हरविल्याबाबत तक्रार दिली.
पत्नी पतीच्या अंत्यसंस्काराला आली नाही
ठाणे जिल्हयातील खडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महेशने ३ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती रमेश ताथोडे यांना खडवली पोलिसांनी दिली. ताथोडे हे नातेवाईकांसह खडवली ठाण्यात पोहोचले. ५ मे रोजी मुलाचा मृतदेह घेऊन ते अमरावतीत परतले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आला. दरम्यान, महेशच्या अंत्यसंस्काराकडे त्याची पत्नी व अन्य तीन नातेवाइकांनी पाठ फिरवली. महेशने पत्नी व तिच्या तीन नातेवाइकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार महेशच्या वडिलांनी दिली.