अमरावती/ संदीप मानकर
वाहनावरील फॅन्सी नंबरचे वेड अनेकांना असते. वाटेल ती किंमत मोजून हा क्रमांक मिळविण्याची वाहनमालकांची तयारी असते. विशेषत: यात राजकीय पुढारी व उद्योजक पुढे असतात. अमरावतीकरांना ०००१ हा व्हीव्हीआयपी नंबर आवडतो. एका वाहनधारकाने या नंबरसाठी आरटीओत तब्बल तीन लाख रुपये मोजल्याची माहिती समोर आली आहे.
अमरावतीकरांमध्ये ७८६ हा क्रमांकाचीसुद्धा क्रेझ आहे. या क्रमांकासाठी नवीन कार विकत घेतलेल्या मालकांनी चॉईस नंबर घेऊन आरटीओकडे दीड लाख रुपये मोजले आहेत. तसेच ९, ९९, ९९९ व ९९९९ या सिरीजसाठी दीड लाख, १११, ११११ यासाठी ७० हजार तसेच २२ या क्रमांकासाठी ५० हजार, २२२, २२२२ साठी ७० हजार रुपये भरून हा पसंती क्रमांक ग्राहकांनी घेतल्याची आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शहरातील काही आमदार, राजकीय पुढारी तसेच उद्योजक यांनाही व्हीव्हीआयपी क्रमांकाला पसंती दर्शविली आहे.
या तीन क्रमांकांना सर्वाधिक मागणी
०००१ - तीन लाख
७८६ - दीड लाख
९९९९ - दीड लाख
या नंबरचा रेट जास्त
०००१ - ३ लाख
११११ - ७० हजार
२२२२ - ७० हजार
आरटीओ विभागाची झालेले कमाई
२०१९ - ८२,४८,०००
२०२० - ७६,४०,०००
२०२१ - ७२,१६,५००
बॉक्स:
...तर नंबरसाठी होतो लिलाव
एकाच व्हीव्हीआयपी नंबरला एकापेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शविली असेल, तर अशा स्थितीत आरटीओ नियमानुसार त्या क्रमांकाचा लिलाव करतो. मात्र, अशी परिस्थीत यंदा अमरावतीत उद्भवली नाही. त्यामुळे लिलाव करण्यात आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स :
कोरोनाकाळातही हौसला मोल नाही
लॉकडाऊनमध्ये काही महिने शोरूम बंद होते. मात्र, अनलॉक होताच नागरिकांनी चारचाकी व दुचाकी वाहने खरेदी करण्यासाठी धाव घेतली. यंदा कोरोना असतानाही फॅन्सी क्रमांकातून आरटीओला ७२ लाखांचे उत्पन्न मिळाले. कोरोनाकाळतही हौसेला मोल राहिले नाही. एक क्रमांक तर तब्बल तीन लाख मोजून घेतला गेला. गतवर्षी चॉईस नंबरमधून आरटीओला ७६ लाखांचे उत्पन्न मिळाले होते.
कोट
लॉकडाऊनमध्ये आरटीओचे कामकाज बंद होते. त्यानंतर अनलॉकमध्ये यंदा वाहन खरेदीला नागरिकांची पसंती आहे. तेवढीच पसंती ही फॅन चॉईसनुसार व्हीव्हीआयपी क्रमांकांना आहे. त्यातून आरटीओला चांगला महसूल मिळाला आहे.
- राज बागरी,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती.