अमरावती : पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीवरून ७ मार्चपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला सोमवारी सायंकाळी ५ वाजता हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेले पत्र अमान्य करीत जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या,पाण्याचा मारा केला. तरीही आंदोलनकर्ते थांबले नाहीत अन् पोलिस वाहनांची तोडफोड केली. दरम्यान, आठ पोलिसांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पांढरी खानमपूर येथील सर्व बौद्ध बांधवांनी गावातून लाँग मार्च काढून गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. विभागीय आयुक्तांनी तीन दिवसांचा अवधी मागितला होता. त्यामुळे सर्व आंदोलनकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. गावातील एका गटाने प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी लावून धरली आहे. त्यावर शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही महापुरुषांची नावे प्रवेशद्वाराला द्यावी, प्रवेशद्वार उभारणीसाठी शासन निधी उपलब्ध करून देईल, असा तोडगा सूचविला होता. मात्र प्रशासनाने लेखी पत्र द्यावे, यावर आंदोलक ठाम होते. दरम्यान सोमवारी विभागीय आयुक्तांकडे कमलताई गवई यांच्यासह पांढरीतील दहा महिला-पुरुषांचे शिष्टमंडळासोबत प्रदीर्घ बैठक झाली व आंदोलनकर्त्यांना पत्र देण्यात आले. मात्र प्रशासनाचे पत्र काहींना अमान्य असल्याने आंदोलकांमध्ये धुसफूस वाढली व तणाव निर्माण झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले.
पत्र अमान्य असल्याने वाढला तणावमंगळवारी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व जि.प.च्या सीईओ हे पांढरीला भेट देतील व दोन्ही गटाची गावात बैठक घेऊन तोडगा काढतील, अशा आशयाचे पत्र शिष्ठमंडळाला दिले. मात्र, हे पत्र अमान्य असल्याने काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. विभागीय आयुक्त कार्यालयाचे गेटही तोडले व आतील वाहनांची तोडफोड केली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. आत शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू आहे, असे आंदोलनकर्त्यांना वारंवार पोलीस अधिकारी सांगत होते. दरम्यान काही जणांनी गेटच्या आत प्रवेश केला. पोलिसांवर दगडफेक केली. वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. - नवीनचंद्र रेड्डीपोलीस आयुक्त, अमरावती