: बडनेरातील मेघे अभियांत्रिकीचा विद्यार्थी
अमरावती : श्वेत बटू ता-यात रूपांतरित होणा-या तेजोमय ता-यातील ऊर्जा अंतराळात प्रसरण पावते. त्यावेळी त्यामधून ‘कॉस्मिक रेज’ (लौकिक किरण) बाहेर टाकल्या जातात. पृथ्वीच्या वातावरणात काही वर्षांनी पोहोचणा-या या किरणांचा वेध घेण्याचा प्रकल्प कॅनडात साकारत आहे. त्या प्रकल्पावर संशोधन साहाय्यासाठी बडने-यातील प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी शुभम विनायक गारोडे याची निवड झाली आहे.
कॅनडातील 'ट्रायम्फ' या संशोधन संस्थेने पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत असलेल्या शुभमला १ नोव्हेंबर २०१९ ते ३१ जुलै २०२० या कालावधीत संशोधनाकरिता आमंत्रित केले आहे. तेथे तो ‘डिझाईन अॅन्ड अॅनॅलिसीस आॅफ मल्टिफोटो, मल्टिफ्लायर’ या प्रकल्पांतर्गत सेन्सर व स्ट्रक्चरच्या उभारणीत साहाय्य करणार आहे. एकूण २० जणांच्या या चमूत काही स्कॉलर, प्राध्यापक व संशोधक वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन करणार आहेत. ते एका स्ट्रक्चरची उभारणी करणार असून, अनेक धातूंपासून तयार होणा-या ‘हायपर के’ पद्धतीच्या या स्ट्रक्चरची उंची १० मजली इमारतीएवढी आणि रुंदी २५ मीटरपर्यंत असू शकते, अशी माहिती एम.ई. (मेकॅनिकल) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी शुभमने दिली आहे. तो कॅनडाकरिता २५ नोव्हेंबर रोजी प्रयाण करणार आहे.
शुभम गारोडे याने अमरावती येथील समर्थ हायस्कूलमधून इयत्ता दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. बडनेरा येथील प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतले आहे. कॅनडा सरकारकडून शुभम गारोडे यास विद्यावेतनदेखील मिळणार आहे. शुभम याचे वडील सीआयडीमध्ये ठसेतज्ज्ञ निरीक्षक असून, अमरावती येथे कार्यरत आहेत. त्याच्या यशाबद्दल आई-वडिलांसह गुरुजन, धनंजय पाटील यांनी कौतुक केले आहे.