अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील गाव सोडलेले शेकडो बौद्धबांधव गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले. यावेळी विभागीय आयुक्तांशी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी तासभर चर्चा झाली; परंतु या चर्चेमध्ये कोणतीही ठोस निर्णय न झाल्याने अखेर विभागीय आयुक्त कार्यालयावरच बौद्ध समाजबांधवांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
पांढरी खानमपूर येथील गावातील मुख्य प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून दोन समाजामध्ये वाद सुरू झाला आहे. मागील महिन्याभरापासून हा वाद पेटला असून ६ मार्चला बौद्ध समाजबांधवांनी प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी आपल्या मुला-बाळांसह तसेच गुरे-ढोरांना सोबत घेत गाव सोडले. गुरुवारी हे सर्व बौद्धबांधवांनी अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गावातील काही ग्रामपंचायत सदस्य, डॉ. कमल गवई तसेच इतर प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांशी तासभर चर्चा केली. परंतु त्यानंतरही कोणताही ठोस मार्ग न निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रवेशद्वाराच्या बांधकामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत गावी पुन्हा परतणार नसल्याच्या भूमिकेवर बौद्ध समाजबांधव ठाम राहतील, असा निर्णय घेतला.आयुक्तांनी मागितला तीन दिवसांचा अवधीविभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी गावातील नागरिकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तीन दिवस आलेल्या शासकीय सुट्ट्यांमुळे सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देत तो पर्यंत पुन्हा गावात परतण्याची विनंती केली. गावांमध्ये पूर्ण संरक्षण आणि तसेच संबधित ॲट्रॉसिटी दाखल असलेला आरोपी कमलेश पटेल व इतर १८ जणांना अटक करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. परंतु बौद्धबांधव प्रवेशद्वाराचे कामाला जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत पुन्हा गावात न परतण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने ठोस निर्णय झाला नाही.