प्रदीप भाकरे अमरावती : विदेशी नोटांच्या नावावर गंडविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व दर्यापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवार, ३० जुलै रोजी पर्दाफाश केला. या टोळीतील तीन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विदेशी नोटा, रोख व मोबाइल असा एकूण २ लाख ७९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीतील पुरुष आरोपींचा शोध सुरू आहे.
शांतामीर फिरोजमीर (२७) रा. मुज्जफराबाद, गोकुलपुरी, उत्तर दिल्ली, शिल्पीबेगम भुरहान शेख (४०) रा. बेगूर, कर्नाटक व नाझीया मोहम्मद इम्रान (३२) रा. जे. जे. कॉलनी ब्लॉक, ई-बवाना, नॉर्थ वेस्ट दिल्ली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दर्यापूर येथील रहिवासी उमेश सुरेश गावंडे (३८) यांच्या मिनी बँक ऑनलाइन सेंटरवर जाऊन दोन पुरुष व एका महिलेने आपल्या जवळील विदेशी नोटा दाखविल्या. त्या विदेशी नोटा भारतीय चलनात बदलून देता का, अशी विचारणा त्यांनी उमेश गावंडे यांना केली. उमेश गावंडे यांनी होकार दिल्यावर आरोपींनी त्यांच्याजवळून ५० हजार रुपये घेतले. त्याचवेळी त्यांना एक बॅग देत त्यात विदेशी नोटा असल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले. दरम्यान, उमेश गावंडे यांनी बॅग बघितल्यावर त्यात चक्क रद्दी पेपर आढळून आले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर उमेश गावंडे यांनी २८ जुलै रोजी दर्यापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात सदर ठकसेनांची टोळी मूर्तिजापूर येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने मूर्तिजापुरातील चिखली मार्गावर आरोपी भाड्याने राहत असलेल्या खोलीवर धाड टाकली. यावेळी खोलीत सदर तिनही आरोपी महिला आढळून आल्यात. खोलीच्या झडतीत विदेशी नोटा, २ लाख ६५ हजार २५० रुपये रोख व १० मोबाइल असा २ लाख ७९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्यानुसार पथकाने मुद्देमाल जप्त करून तिनही महिला आरोपींना अटक केली. त्यांना पुढील कारवाईसाठी दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या टोळीतील पुरुष आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, सय्यद अजमत, नीलेश डांगोरे, श्याम मते, सिद्धार्थ आठवले, उमेश वाकपांजर, प्रभाकर डोंगरे, प्रतीभा लुंगे, किरण सरदार, चेतन गुल्हाने, रितेश वानखडे यांनी केली.