अनिल कडू
परतवाडा : सावधान आगे 'शेठजी को लडका हुआ मिठाई बाटना चालू है', 'दंगा हुआ है' असे म्हणत पोलीस असल्याची बतावणी करून महिलांचे दागिने पळविणारी इराणी गॅंग अचलपूर- परतवाडा शहरात दाखल झाली आहे. या अनुषंगाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
हे इराणी गँगचे सदस्य मोटर सायकल वरून फिरतात. वृद्ध महिला व पुरुषांना ते टार्गेट करतात. या गॅंग मधील एक सदस्य साध्या वेशात त्या वृद्धांजवळ पोहोचतात. पोलीस असल्याचे बतावणी करतात. शहरात दंगा झाला आहे. लूटपाट सुरू आहे. चोरांची टोळी आलेली आहे.अंगावरील दागिने काढा. रुमाल किंवा थैलीमध्ये बांधून घ्या. तसे न केल्यास तुमचे दागिने लुटल्या जातील. असे सांगत असतानाच दुसरा सदस्य पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्याकडे पोहोचतो. साहेब माझे दागिने तुमच्याकडे ठेवा समोर चोर आलेले आहेत असे सांगत त्या वृद्ध महिला व पुरुषांचा विश्वास संपादन करतो. अंगावरील सोन्याचे दागिने त्यांच्याकडील रुमाल किंवा थैलीत ठेवण्यास सांगतो. पुढे लागलीच हात चलाखी करत ते इराणी गॅंगचे सदस्य त्या वृद्ध महिला व पुरुषांची दागिने चोरून तेथून पळ काढत असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
दोन महिलांनी सतर्कता बाळगल्यामुळे त्यांचे दागिने बचावले असले तरी त्यांनी या इराणी गॅंग विषयी आणि त्यांच्यावर उडवलेल्या प्रसंगा विषयी माहिती परतवाडा पोलिसांना दिली. यावरून अचलपूर परतवाडा शहरातील पोलीस सतर्क झाले आहेत.
पोलीस अधिकारी, कर्मचारी महिला व पुरुषांना अंगावरील दागिने काढण्यास सांगत नाही. अनोळखी व्यक्ती सोबत बोलणे टाळावे. संशयित व्यक्ती अथवा त्याच्या हालचाली संशयित वाटल्यास पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
- संदीप चव्हाण, ठाणेदार परतवाडा.