अमरावती: मोझरी येथील कुख्यात गुंड कैलास दिलिप पोहकर (२१) याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला एक वर्षांकरीता कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. ६ ऑक्टोबर रोजी त्याची येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक तपन कोल्हे, उपनिरिक्षक आशिष शिंदे तथा तिवसाचे ठाणेदार संदीप चव्हान यांनी ही कार्यवाही पुर्ण केली. कैलास पोहकर याच्याविरूध्द विनयभंग, शासकीय कामकाजात अडथळा, धमकी, जबर दुखापत अदे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरूध्द अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
मात्र त्याला तो जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी त्याच्या स्थानबध्दतेचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी केली. तो धोकादायक गुंड असल्याची खात्री झाल्याने त्याला एक वर्षांकरीता अमरावती जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश ६ ऑक्टोबर रोजी पारित केला. त्यामुळे तत्काळ त्याचा शोध घेत, त्याला गुरूवारीच कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.