अमरावती: नातेवाईकांना पीडीएमसी दवाखान्यातून साईनगरला न्यायचे आहे, असे सांगून कार टॅक्सी मागविणाऱ्या भामट्याने चक्क ती टॅक्सीच पळविली. २१ मार्च रोजी सकाळी १०.३० ते दुपारी दोनच्या सुमारास तो प्रकार घडला. याप्रकरणी, टॅक्सीमालक संग्राम तुळशीराण मेश्राम (४९, महादेव खोरी) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी २८ मार्च रोजी सायंकाळी आरोपी मोबाईलधारक किशोर कुमरे (रा. अमरावती) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, आपल्या नातेवाइकांना पीडीएमसी येथून साईनगर येथे पोहचून दयायचे आहे, त्यासाठी चार पाच वेळा येणे जाणे करावे लागेल, असा फोन कॉल संग्राम मेश्राम यांना आला. त्यानुसार ते सकाळी ११ च्या सुमारास पीडीएमसीच्या पार्किंगमध्ये आले. १५०० रुपये भाडे देखील ठरले. दरम्यान आपल्या नातेवाइकाला सुटटी व्हायला वेळ आहे, अशी बतावणी किशोर कुमरे याने केली. त्यांनी सोबत चहा नाश्टा देखील घेतला. दुपारी दोनच्या सुमारास भूक लागल्याने घरून जेवन करून येतो, असे मेश्राम यांनी कुमरेला सांगितले. दरम्यान आरोपीने मेश्राम यांना विश्वासात घेतले. आधार व पॅनकार्ड तुमच्या मोबाइलवर पाठवतो तुमच्या गाडीची चावी माझ्याकडे दया, जर माझ्या नातेवाइकांना सुटी झाली तर मी तुमच्या गाडीने त्यांना सोडून गाडी परत आणून देईल, अशी बतावणी त्याने केली. भाड्याचे १५०० रुपये देखील आरोपीने दिले.
जीपीएस लोकेशन मानाजवळआरोपीवर विश्वास ठेऊन मेश्राम हे जेवायला निघून गेले. दरम्यान काही वेळाने त्यांच्या मोबाइलवर टॅक्सीचे जीपीआरएस लोकेशन हे माना पोलीस ठाण्याजवळ दिसले. त्यामुळे मेश्राम यांनी किशोर कुमरे याला फोन कॉल करत विचारणा केली. त्यावेळी त्याने पीडीएमसी येथे गाडी घेऊन पोहचतो असे सांगितले. मेश्राम यांनी दिवसभर पीडीएमसीमध्ये थांबून आरोपीची प्रतीक्षा केली. मात्र तो आला नाही. सात दिवस वाट पाहिल्यानंतरही तो न परतल्याने मेश्राम यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. तथा आरोपी हा आपली एम एच २७ बी एक्स २२०७ ही टॅक्सी गाडी घेऊन गेल्याची तक्रार नोंदविली.