लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : येथील साडेसातशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी शिवालय हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. निसर्गरम्य परिसरात हे पुरातन ऐतिहासिक मंदिर संपूर्ण दगडी बांधणीचे असून, त्यावरील कोरीव शिल्प व रेखीव बांधकामाने केवळ पावन आणि पवित्रच नव्हे तर प्रेक्षणीयपण आहे. श्रावण मासानिमित्त दूर-दुरून भाविक येथे दर्शनास येतात.श्री भगवान खंडेश्वराचे हे पुरातन देवालय रामदेवराच्या कारकिर्दीतील शके ११७७ आनंद संवत्सरी म्हणजे इ.सन. १२५४-५५ मधे म्हणजे अंदाजे ७५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे. हेमाडपंथी वास्तुशिल्प कलेच्या उत्कृष्ट कलाकृती तेथील शिवमंदिराच्या दगडी भिंतीवर कोरलेल्या आहेत. प्रमुख शिवालयाच्या पूर्वेकडील दर्शनी दरवाजावरील शिल्पकाम प्राचीन शिल्पकारांच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष देत आहे. रामदेवरायाचा पंतप्रधान हेमाद्रीपंत यांनी हे पुरातन शिवालय बांधल्याची नोंद मंदिरावर देवनागरी लिपीत लिहिलेल्या शिलालेखात अंकित आहे.दगडी रेखीव चिऱ्यांनी बांधलेल्या या शिवालयात विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या विटांची जोडणी आहे. या विटा आजही पाण्यावर तरंगतात. शिवालयात प्राचीन शिवलिंगाची स्थापना केली आहे. उत्तरेकडे दुसरे मंदिर शिव-पार्वतीचे आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील देवळांत नृसिंहाची मूर्ती हिरण्य कश्यपूला मांडीवर घेऊन आपल्या तीक्ष्ण नखांनी त्यांचे पोट फाडून वध करताना दिसते. या तीनही देवळांना जोडणारा गाभारा मात्र एकच असून तो प्रशस्त आहे. शिवमंदिराच्या या गाभाऱ्यांत मध्यभागी शिवाचे वाहन नंदी आहे. देवळाच्या सभोवताली पक्क्या बांधणीचा दगडी परकोट आहे. देवालयाचे महाद्वार दक्षिणेकडे असून त्यासमोर अष्टभुजा देवीचे मंदिर आहे. पूर्वेकडे उंच अशी ‘दीपमाळ’ असून त्यासमोर वं. राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविला आहे. ५ आॅगस्टला पहिलाच श्रावण सोमवार असल्याने या शिवालयात हजारो शिवभक्तांची मांदियाळी राहणार आहे.श्री खंडेश्वराचे ऐतिहासिक महत्त्वऐतिहासिकदृष्ट्या या प्राचीन देवालयाचे महत्त्व विशेष आहे. कौंडिण्य मुनीच्या शिष्यांत ‘खंड्या’ नावांचा शिष्य अत्यंत लाडका होता. याच खंड्याने स्थापन केलेला महादेव म्हणजेच ‘खंडेश्वर होय. या खंडेश्वराच्या कृपा छत्राखाली नांदणारे गाव म्हणजेच नांदगाव खंडेश्वर आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात वसलेले हे एक प्रसिद्ध व पवित्र ऐतिहासिक, पौराणिक शिवतीर्थ आहे. श्रावण सोमवार, प्रदोष किंवा शिवरात्रीस परिसरातील खंडेश्वर- बोंडेश्वर व कोंडेश्वर या तीन शिवतीर्थाची पदयात्रा करणाऱ्यास काटी यात्रेचे पुण्य मिळते, अशी भाविकांनी श्रद्ध आहे. श्रावणमासाच्या पर्वात लाखो बेलांच्या पानांचा अभिषेक ’ओम् नमो शिवाय’ मंत्राचा जप, शंखनाद व उफळीच्या -डमरूच्या तालावर निनादात त्रिशूल हातात घेऊन ‘हरबोला-हर हर महादेव’च्या गजरात तल्लीन होऊन दूरदुरचे शिवभक्त येथे सोमवारी हजेरी लावणार आहेत.
भाविकांचे श्रद्धास्थान नांदगाव खंडेश्वरचे पुरातन शिवालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:04 PM
येथील साडेसातशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी शिवालय हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. निसर्गरम्य परिसरात हे पुरातन ऐतिहासिक मंदिर संपूर्ण दगडी बांधणीचे असून, त्यावरील कोरीव शिल्प व रेखीव बांधकामाने केवळ पावन आणि पवित्रच नव्हे तर प्रेक्षणीयपण आहे. श्रावण मासानिमित्त दूर-दुरून भाविक येथे दर्शनास येतात.
ठळक मुद्देआज पहिला श्रावण सोमवार : ‘ओम नमो: शिवाय’च्या जयजयकाराने गुंजणार मंदिर