इनडेप्थ स्टोरी
अमरावती : ‘त्या’ दरोडेखोराने प्रतिकार करत असलेल्या त्या महिलेच्या हातावर चाकुने वार केला. मात्र, सोन्याचा ऐवज घेऊन पळत असताना त्याने त्या महिलेला, ‘हळद लावा, रक्त थांबेल’, असा सल्ला दिला. त्या इवल्याशा धाग्याच्या साह्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा पट उलगडला. तपासाला सोबत झाली ती, आरोपींनी घटनास्थळावर सोडून दिलेल्या वाहनाची. ते वाहन चोरीचे निघाले. चांदूरबाजार तालुक्यातून ते वाहन चोरल्याचे निष्पन्न होताच, त्या दिशेने तपास करण्यात आला. अन् आरोपी असलेला मुख्य सूत्रधार समीर शाह अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
सात महिन्यांपूर्वी स्थानिक माधवनगरात पडलेल्या दरोड्याचा गुंता सोडविण्यात गुन्हे शाखा व राजापेठ पोलीस पथकाला दोन दिवसांपूर्वी यश आले. मुख्य सूत्रधारासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ७ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ८ च्या सुमारास आरोपी समीरशाह हा माधवनगरातील आपल्या जुन्या घरमालकाकडे पोहोचला. सोबत अन्य एक जणदेखील होता. त्याने तेथील घरमालकीणीच्या गळ्याला चाकू लावला. जिवाच्या आकांताने त्या महिलेने अालमारी दाखवली. दोन दरोडखोरांनी तेथून ३ लाख ९६ हजारांचा सोन्याचा ऐवज जॅकेटमध्ये टाकला. घराच्या मागच्या दारातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने घरमालकीन महिलेच्या हातावर चाकूने वार केला. तेवढ्यात त्या महिलेचे पती घरी आले. दोन्ही आरोपींनी पतीलादेखील चाकुने मारून जखमी केले. ते घराच्या समोरील दाराने पळाले. मात्र, त्यांनी स्वत:ची दुचाकी तेथेच टाकून दिली. दोन आरोपींपैकी एकाने बंदुकीतून दोन गोळ्या हवेत झाडल्या. रस्त्यावर एका इसमाला मारहाण करून त्याच्याजवळील दुचाकी घेऊन आरोपींनी पळ काढला.
आरोपी ओळखीचे असावेत
आरोपीने हळद लावण्याचा दिलेला सल्ला बयानात देखील नोंदविला गेला. एखादा दरोडेखोर, आरोपी एखाद्यावर हल्ला करून हळद लावण्याचा सल्ला देत असेल, तर आरोपी नक्कीच ओळख, परिचयातील असावा, असे निरीक्षण राजापेठच्या तत्कालिन ठाणेदारांनी नोंदविले. त्यावरून तपासाची दिशा निश्चित झाली. वरच्या माळ्यावरील खोलीत राहणाऱ्या भाडेकरुंची इत्यंभूत माहिती घेण्यात आली. तपासात अनेक मुद्द्यावर काम करण्यात आले. त्यातील हळद लावण्याचा सल्ला व घटनास्थळावर सोडलेले वाहन पोलिसांना आरोपींपर्यंत घेऊन गेले.
दुचाकी चोरांसोबत कनेक्शन?
आरोपी जी दुचाकी घटनास्थळावर सोडून गेले, ती चांदूरबाजार तालुक्यातून चोरल्याची माहिती तपासात समोर आली. ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ५३ दुचाकी जप्त केल्या. त्यातील सर्वाधिक दुचाकी चांदूरबाजार तालुक्यातील विविध गाव, शिवारांमधून चोरण्यात आल्या. त्या कनेक्शनच्या दिशेने देखील राजापेठ पोलीस तपास करणार आहेत.
कोट
हळद लावण्याचा मुद्दा बयाणात नोंदविला आहे. घटनास्थळावर सोडलेल्या दुचाकीचा तपास करत असताना आरोपीपर्यंत पोहोचता आले.
- योगेश इंगळे,
सहायक पोलीस निरीक्षक, राजापेठ