औचित्य ‘गळाभेट’ उपक्रमाचे : कैद्यांच्या मुलांना ‘बालकदिना’ची अनोखी भेट वर्षा वैजापूरकर अमरावतीभिरभिरणारे डोळे.. हृदयात चाललेली कालवाकालव लपविण्याचा अयशस्वी प्रयत्न.. ओठांशी येऊ पाहणारे हुंदक्यांचे कढ आवरण्याची धडपड आणि तरीही उत्तुंग भिंतीआड शिक्षा भोगणाऱ्या आपल्या पित्याला भेटण्याची अनिवार ओढ, अशी काहीशी अवस्था असलेली चिमुरडी कारागृहाच्या विशाल दरवाजातून आत पोहोचली. तेथेही काहीशी अशीच अवस्था. परिस्थितीमुळे विलग झालेल्या पोटच्या गोळ्यांना कधी एकदा पाहतोे नी कधी नाही, या आतुरतेने चुळबुळणारे कैदी...नव्हे त्या क्षणी फक्त जन्मदातेच. मुले-वडिल समोरासमोर आले आणि कारागृहाच्या पाषाण भिंतीही अक्षरश: हुंदके देऊ लागल्या. क्षणभर आसमंत स्तबद्ध झाला. सारेच ‘स्पिचलेस’. बोलत होते फक्त अश्रू. सोमवारी कारागृहात आयोजित ‘गळाभेट’ उपक्रमादरम्यानचे हे विदारक आणि हृदय हेलावणारे दृश्य.भावनांचा बांध फुटलाअमरावती : कारागृह प्रशासनाच्या परिपत्रानुसार बालकदिनाच्या औचित्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कारागृह अधीक्षक भाईदास ढोले व कैद्यांच्या पुनर्वसनाकरिता कार्यरत ‘वऱ्हाड’ संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला. मध्यवर्ती कारागृहात प्रदीघ शिक्षा भोगणाऱ्या राज्यभरातील २५ कैद्यांच्या कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या ४७ पाल्यांना या उपक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. हातून कळत नकळत घडलेल्या चुकांची शिक्षा भोगणारे वडील आणि कुठलीही चूक नसताना पित्यापासून विलग राहण्याची शिक्षा भोगणारी मुले या उपक्रमानिमित्ताने समोरासमोर आली.अनेक मुले त्यांच्या वडिलांना कित्येक वर्षांनी पाहात होती. काहींना तर पित्याला पहिल्यांदाच पाहण्याचा योग आला होता. समोरासमोर येताच दोघांच्याही भावनांचा बांध फुटला. आसमंतात गुंजत राहिले मुसमुसण्याचे आवाज आणि हुंदके. तेथे उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. नि:शब्द शांतता बरेच काही बोलून गेली. मग, सुरू झाला तो भावसोहळा. पालकांनी मुलांना आलिंगन दिले. मुले पित्याच्या कुशीत विसावली. विरहाच्या पाषाण भिंती कोसळून पडल्या. एका डोळ्यांत आसू आणि एका डोळ्यांत हसू.. असेच काहीसे वातावरण होते. काहीशी समजदार, कळत्या वयातील मुले सामंजस्याने वडिलांना घराबद्दल, मधल्या काळात घडलेल्या कौटुंबिक घडामोडींबद्दल सांगत होती. तर न कळत्या वयातील चिमुरडी मुले पित्याच्या मांडीवर बसून बालसुलभ गप्पांमध्ये रंगून गेली होती. शाळेच्या गमती..जमती, मित्रांच्या खोड्या..सहा दिवसांपासून नळाला पाणी नाही...काका वारले...सोयाबीनने दगा दिला...आईला बरे नाही...अंगणात गुलाब उमलला..अशा एक ना अनेक राहून गेलेल्या गोष्टी वडिलांच्या कानात कुजबुजण्याची जणू स्पर्धाच लागली होती. एरवी शिस्त, रूक्ष आणि भकासपणाची सवय झालेल्या कारागृहाच्या भिंतीही हा भावनांनी ओथंबलेला किलबिलाट ऐकून गहिवरून गेल्या होत्या. संपूच नये असे वाटत असताना सुद्धा भेटण्याची वेळ संपली. जड अंत:करणाने मुलांनी पालकांना निरोप दिला. विशाल दरवाजातून बाहेर पडताना मुलांचे हात हलत होते..हुंदके दाटत होते आणि आपल्या पोटच्या गोळ्यांना पाठमोरे पाहताना कैद्यांच्या भावना अनिवार होत होत्या. यावेळी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्यासह वरिष्ठ तुरूंगाधिकारी अशोक जाधव, तुरूंगाधिकारी पांडुरंग भुसारे, राजेंद्र ठाकरे, शरद माळशिकरे, एम.एम.जोशी, सी.एम.कदम, मोहन चव्हाण, महिला तुरूंगाधिकारी माया धतुरे, ज्योती आठवले, सुभेदार लांडे, महिला रक्षक प्रियंका गेडाम, अलका दहिजे, सुवर्णा सूर्यवंशी, सागर फाटे, उमेश राठोड, शेरसिंग पवार, दीपक चुडे आदी उपस्थित होते तर वऱ्हाड संस्थेचे रविंद्र वैद्य, धनानंद नागदिवे, मनोज गायकवाड, वनमाला महाजन, लता बनसोड उपस्थित होते. तुळशीचे रोपटे अन् जेवणाचा आस्वादआपल्या वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या चिमुरड्यांना कारागृह प्रशासनाच्यावतीने तुळशीचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले तर वऱ्हाड संस्थेच्यावतीने प्रत्येक बालकासाठी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. माणुसकीची खरी परिभाषाच या उपक्रमाच्या निमित्ताने उलगडली, असे म्हणता येईल. न्यूनगंड नको...खूप मोठे व्हा !ठाण्याहून आलेले सोनल व तुषार. यांचे वडील राजू पांडुरंग कोकाटे २००३ पासून या कारागृहात खुनाच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगत आहेत. तब्बल पाच वर्षांनी ही भावंडे पित्याला भेटत होती. सोनल बारीवीची विद्यार्थिनी तर तुषार नववीत. सध्या ही भावंडे आईसह ठाण्याला राहतात. पित्याच्या भेटीची आतुरता त्यांना येथे घेऊन आली. सोनल परिस्थितीमुळे कदाचित वयापेक्षा अधिक समंजस भासणारी. तिने या उपक्रमाबद्दल कारागृह अधीक्षकांचे आभार मानले. ती म्हणाली, वडील कारागृहात आहेत म्हणून न्यूनगंड बाळगू नका. आशावादी रहा. खूप शिका..मोठे व्हा.. हाच जिवनाचा उद्देश असू द्या. सोनल बोलता-बोलता भावूक झाली आणि पुन्हा एकदा कारागृह भावविव्हळ झाले.
अन् मुसमुसल्या पाषाण भिंती !
By admin | Published: November 15, 2016 12:06 AM