अमरावती : सर्वत्र हाहाकार माजवून सोडलेल्या कोरोना संकटाने सर्वांचेच टेन्शन वाढविले असताना, शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच्या पहिल्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंगणवाडी, बालवाडीतील गतवर्षातील व यावर्षीच्याही विद्यार्थ्यांना शाळेचे दर्शन दुर्लभच होणार आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गतवर्षी पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला होता तसेच सत्राच्या शेवटी परीक्षा न देता पुढील वर्गासाठी ते पात्र ठरले. परंतु, अंगणवाडी, बालवाडीतील विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना आपल्या हातात वही, पाटी-पेन्सिल न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. त्या सर्वांनी आपल्या शिक्षकांसह शाळेचेही वर्षभरात तोंड पाहिलेले नाही. प्राथमिक विद्यार्थ्यांना त्या वर्गाचा अभ्यास तर सोडाच, शाळा व तेथील शिक्षकांची ओळखदेखील न होता पुढील वर्गात प्रवेश केला. त्यामुळे इतर पालकांची चिंता अधिक वाढली आहे.
यावर्षी मुलांवर कोरोनाने भयंकर संकट ओढवणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे जूनपासून शाळा नियमित सुरू होणे अशक्य आहे. विद्यार्थ्यांना अक्षरओळख, अंकज्ञान व अन्य विषयांचे ज्ञान न होता, त्यांना पुढील वर्गात बसविणे पालकांना धोक्याचे वाटते. ऑनलाईन शिक्षणाचा विचार केल्यास, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांना अद्याप अँड्रॉईड मोबाइल उपलब्ध झालेला नाही. हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ते मोबाईल विकत घेऊ शकत नाहीत. प्रत्येक गावात मोबाईलची रेंज नाही. असे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहापासून वर्षभर तरी दूर आहेत. वर्गातील प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाईन शिक्षणात फरक पडत असून प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणापेक्षा मोबाईलवरील खेळ व इतर गोष्टीत रस वाटतो. पालक व शिक्षकांचे लक्ष चुकवून ते अशा गोष्टी करीत असतात. ऑनलाईन शिक्षण त्यांच्या पचनी पडण्यासाठी काही अवधी लागेल.
कोट
माझा मुलगा मागील वर्षी पहिलीत गेला. तो शाळेत न जाता पास झाला. शाळेची व शिक्षकांची ओळखही न होता यावर्षी तो दुसरीत जाईल. त्याच्या ज्ञानाचे काय?
अतुल कावरे, पालक