अमरावती : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनवाढीच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी ४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील जवळपास २ हजार ६४६ अंगणवाडीला टाळे लागले आहे. गुरुवारी अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन आयटक कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा आक्रोश मोर्चा धडकला. शेकडोच्या संख्येेने अंगणवाडी सेविका या संपात सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद संपामध्ये जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ६३५ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे जवळपास दीड लाखांच्या जवळपास बालांच्या पोषण आहार वाटपावर याचा परिणाम झाल आहे. परंतु जो पर्यंत सरकार अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करत नाही तो पर्यंत कामबंद संपातून माघार न घेण्याच्या भूमिकेवर सेविका ठाम आहेत. गुरुवारी निघालेल्या मोर्चामधून अंगणवाडी सेविकांना सर्वोच्च न्यायालयाने २५ एप्रिल २०१७ रोजी ग्रॅज्युटी बाबात दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करणे, अंगणवाडी सेविका कर्मचारी पदे ही वैधानिक पद घोषीतकरुन येणारी वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधी देण्यात यावे, अंगणवाडी सेविका व मिनी अंगणाडीसेविका यांना २६ हजार तर मदतनीसला २० हजार मानधन वाढ करावी, आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ रुपये तर अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये करावा, अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीचे व्यतिरिक्त इतर कोणतेही कामे देण्यात येऊ नये अशा विविध मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. तसेच मागण्यामान्य न झाल्यास १८ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर महामोर्चा काढण्याचा इशाराही अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन आयटकने दिला आहे.