अमरावती : पत्नीचा मोबाईल क्रमांक मागितल्याने आपला राग अनावर झाला. वाद होऊन हाणामारी झाली. त्यातच राफ्टरने डोक्यावर वार करून आपण त्याला संपविले, अशी प्राथमिक कबुली खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या संशयिताने मंगळवारी दिली. मात्र, हत्येमागे नेमके तेच कारण की, अन्य काही, ते पोलीस कोठडीदरम्यान स्पष्ट होणार आहे. गोपाल मोतीराम ठाकरे (४५, वल्लभनगर) यांचा मृतदेह ३१ जानेवारी रोजी दुपारी स्वाभिमाननगरात आढळून आला होता.
याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास चालविला. अवघ्या काही तासात रवींद्र मधुकर हेंडसकर (४५, रा. वल्लभनगर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी दुपारी त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असा आहे खुनाचा घटनाक्रम
पोलीस सूत्रांनुसार, आरोपी व मृत हे दोघेही वल्लभनगरातील रहिवासी. दोघांमध्ये बऱ्यापैकी ओळख होती. भाजीविक्री करणाऱ्या गोपाल ठाकरे यांनी ३१ जानेवारी रोजी भाजीपाला हातागाडी लावली नाही. दुपारी ३ च्या सुमारास गोपाल व रवींद्र हेंडसकर हे नजीकच्या स्वाभिमाननगरात दारू पिले. त्यादरम्यान गोपालने रवींद्रला त्याच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक मागितला. त्यावर रवींद्रने तुला काय गरज, अशी विचारणा करून गोपालला शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यातच तेथील एक राफ्टर उचलून रवींद्रने गोपालच्या डोक्यावर वार केले. ४ ते ५ च्या सुमारास ती घटना घडली असावी. गोपाल सायंकाळपर्यंत तेथेच रक्तबंबाळ स्थितीत पडून होता. त्याला त्याच स्थितीत टाकून तो बडनेराकडे पळून गेला. गुन्हे शाखेने त्याला बडनेराहून अटक केल्याची माहिती खोलापुरी गेट पोलिसांनी दिली.
मृताने पत्नीचा मोबाईल क्रमांक मागितला. त्यातून वाद झाल्याची प्राथमिक माहिती अटक केलेल्या संशयिताने दिली. पोलीस कोठडीदरम्यान, कारणांचा उलगडा होईल.
- भारत गायकवाड,
सहायक पोलीस आयुक्त