धामक येथील प्रकार : औषधींचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित नांदगाव खंडेश्वर : नजीकच्या धामक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. औषधींचा तुटवडा असल्याने रूग्णांवर योग्य उपचार होत नसून वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहात नसल्यामुळे रुग्णांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत. या प्रकारामुळे संतप्त धामकवासीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला गुरूवारी कुलूप ठोकले. जोपर्यंत रूग्णसेवेबाबत ठोस निर्णय आरोग्य यंत्रणा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार धामकवासीयांनी केला आहे. धामक पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी ए.व्ही.देशमुख व नागोलकर मुख्यालयी राहात नसून ते सतत गैरहजर असतात. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारावर कुणाचाच अंकुश राहिलेला नाही. येथील इतर कर्मचारी सुद्धा मुख्यालयी राहात नाहीत. त्यामुळे धामक परिसरातील रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. धामक प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे सात ते आठ गावांतील रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली जाते. परंतु वैद्यकीय अधिकारीच गैरहजर असतील तर मग रूग्णांवर उपचार करणार कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे. गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करून नव्या अधिकाऱ्यांची येथे नेमणूक करावी, आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरावी, रुग्णालयात स्वच्छता ठेवावी, पुरेसा औषधसाठा पुरवावा, ओपीडीच्या वेळेवर अधिकाऱ्यांनी हजर रहावे, २४ तास आरोग्यसेवा मिळावी, रूग्णांची हेळसांड न करता योग्य तऱ्हेने तपासणी करावी आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. उपरोक्त मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी केला आहे. या आंदोलनामध्ये ग्रा.पं. सदस्य जयदीप काकडे, उपसरपंच जमीर खाँ पठाण, रमेश दुधमोचन, शेख इस्माईल, चंद्रशेखर कडूकार, शेख राजीक शेख रहेमान, प्रल्हाद मोहुर्ले, वासुदेव राऊत, कल्पेश सोनकुसरे, जाबीरखाँ, सुरेश राजुरकर, नारायण वैष्णव, गजानन सुरसुजे, प्रवीण नगराळे, अजय कदम, गौतम नगराळे, राजू जगताप, नरेश राऊत, वसंत मोहुर्ले, मारोती ठाकरे यांच्यासह गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
संतप्त ग्रामस्थांनी पीएचसीला ठोकले कुलूप
By admin | Published: April 21, 2017 12:20 AM