लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धारणी तालुक्यातील सहा गामपंचायतींच्या सचिवांच्या तक्रारीवरून कंपनी संचालक अनिल खडसे व सिद्धार्थ मनोहरे या दोघांविरुद्ध २ मार्च रोजी दुपारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या १५ दिवसांपासून संबंधित सचिव जिल्हा परिषद व पोलीस आयुक्तालयाचे उंबरठे झिजवत होते. अखेर तक्रारीच्या १६ व्या दिवशी त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली. सहा ग्रामपंचायतींच्या स्थानिक आयसीआसीआय बँकेतील खात्यातून दोन्ही आरोपींच्या खात्यात एकूण ६४ लाख ९ हजार ७३५ रुपये वळते झाले. अर्थात तेवढ्या रकमेचा गैरव्यवहार झाला. टिटंबा, घुटी, काकरमल या तीन ग्रामपंचायतींच्या फसवणुकीबाबत तीन स्वतंत्र एफआयआर नोंदविण्यात आले, तर बिजुधावडी, चौराकुंड व मांगिया या तीन ग्रामपंचायतींचा कारभार एकाच कंत्राटी ग्रामसेवकाकडे असल्याने त्या तीन ग्रामपंचायतींबाबत एक असे एकूण चार एफआयआर नोंदविण्यात आले. त्यानुसार कंपनी संचालक अनिल पुंडलिकराव खडसे (रा. श्यामनगर, अमरावती) व सिद्धार्थ रमेश मनोहरे (रा. अंजनसिंगी, ता. धामणगाव रेल्वे) या दोघांविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी भादंविचे कलम ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.आम्ही सचिव म्हणून ‘एल वन’ ठरलेल्या अनिल खडसेच्या कंपनीसोबत करारनामा केला. आरोपींनी आपल्याला त्याच्या श्यामनगर स्थित कार्यालयात बोलावून घेऊन आमच्या डिजिटल साइन असलेला पेनड्राईव्ह ठेवून घेतला. त्यानंतर त्या डीएससीचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या खात्यातून स्वत:च्या खात्यात रक्कम वळती केली तथा निविदेप्रमाणे साहित्य न पुरविता ग्रामपंचायतसह शासनाचीदेखील फसवणूक केल्याचे ग्रामसचिवांनी तक्रारीत म्हटले आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘लोकमत’च्या दणक्याने चौकशीला वेग‘८७ लाखांचा आर्थिक गैरव्यवहार, अनिल खडसेला अभय कुणाचे?’ या वृत्तातून ‘लोकमत’ने या गैरव्यवहारावर कटाक्ष रोखला. त्यामुळे मंगळवारी पुन्हा संबंधित सरपंच, सचिवांना बोलावून घेत आर्थिक गुन्हे शाखेने संपूर्ण दस्तावेजांची तपासणी केली. त्यांच्याकडून वस्तुनिष्ठ अशी तक्रार लिहून घेतली. त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मंगळवारी उशिरा सायंकाळपर्यंत संबंधित ग्रामसेवक सीपी कार्यालयात होते. दरम्यान, बुधवारी दुपारी स्वतंत्र चार तक्रारी घेऊन आर्थिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तक्रारकर्त्या चार ग्रामसेवकांना घेऊन शहर कोतवालीत पोहोचले. तेथे चारही तक्रारी नोंदवून घेत खडसे व मनोहरेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
७ ते १० फेब्रुवारीदरम्यान ट्रान्झेक्शनसहा ग्रामपंचायतींपैकी बिजुधावडी, चौराकुंड, मांगिया, टिटंबा व काकरमल ग्रामपंचायतीच्या अमरावती स्थित आयसीआयसीआय बँक खात्यातून १० फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ५ च्या दरम्यान आरोपींच्या फर्ममध्ये रक्कम वळती झाली, तर घुटी ग्रामपंचायतीच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान १४ लाख ४२ हजार ३५६ रुपये आरोपींच्या खात्यात वळती करून फसवणूक करण्यात आली.
धारणीला करावी लागणार तक्रारअमरावतीच्या जयस्तंभ चौकस्थित आयसीआयसीआय बँकेतील ज्या सहा ग्रामपंचायतींच्या खात्यातून ६२ लाख रुपयांची रक्कम आरोपींच्या खात्यात वळती झाली, त्या रकमेबाबतच शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, धारणीच्या सेंट्रल बँकेतून जी रक्कम वळती झाली, त्याबाबत ग्रामसेवकांना धारणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागणार आहे. अमरावतीहून परतल्यानंतर तेथे तक्रार दाखल करण्यात येईल, असे संबंधितांकडून सांगण्यात आले.