अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) च्या केंद्रात नियुक्त करण्यात आलेले वादग्रस्त प्राध्यापक अनिल कुमार सौमित्र यांची तात्काळ हकालपट्टी करा, या मागणीसाठी युवक काँग्रेस व एनएसयूआयने मंगळवारी आयआयएमसीच्या आवारात ठिय्या दिला. ‘प्रा. अनिल कुमार सौमित्र गो बॅक’च्या घोषणाबाजीत आंदोलन करण्यात आले. यादरम्यान विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले.
अनिल कुमार सौमित्र हे मध्यप्रदेशात भाजपमध्ये सक्रिय होते तसेच ते मीडिया सेलचे प्रमुख होते. महात्मा गांधींना ‘पाकिस्तानचे राष्ट्रपिता’ असे संबोधल्यामुळे गदारोळ उठल्यानंतर सौमित्र यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. गत महिन्यात दिल्ली येथील आयआयएमसीमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. १ डिसेंबर २०२० रोजी सौमित्र यांनी अमरावती येथील आयआयएमसी केंद्रात भारतीय भाषातील पत्रकारिता शिकविण्यासाठी पदाचे सूत्र हाती घेतली. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमीत जातीयवादी आणि धर्मांध विष पेरणाऱ्या अनिल कुमार सौमित्र यांच्या विरोधात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
काहीही झाले तरी सौमित्र यांची अमरावतीत नियुक्ती खपवून घेतली जाणार नाही, अशी भुमिका युवक काँग्रेसने घेतली. सौमित्र यांची नियुक्त रद्द करण्यात यावी, यासाठी दिल्ली येथील आयआयएमसी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना निवेदन देण्यात आले. मात्र, सौमित्र यांच्या नियुक्तीसंदर्भात ठोस निर्णय होत नसल्याने मंगळवारी युवक काँग्रेस व एनएसयूआयने आयआयएमसीच्या विभागीय संचालकांच्या दालनात ठिय्या दिला.
आंदोलनात युवक काँग्रेस, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, एयआयएसएफ, एनएसयूआय, प्रहार विद्यार्थी संघटना आदींचा सहभाग होता. सागर देशमुख, तुषार देशमुख, सागर दुर्योधन, रीतेश पांडव, पंकज मोरे, संकेत कुलट, नीतेश गुहे, अमर वानखडे, संकेत कुलट, योगेश बुंदिले आदी उपस्थित होते.
आयआयएमसीच्या अतिरिक्त महासंचालकांसोबत मोबाईलवर सौमित्र यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. युवक काँग्रेसची मागणी वरिष्ठांकडे कळविली आहे. महासंचालक याबाबत निर्णय घेतील.
- विजय सातोकार, विभागीय संचालक, आयआयएमसी अमरावती.