६२ गोवंशांना निर्दयतेने कोंबून नेणारा कंटेनर, शिरजगाव ठाणेदारांची कारवाई
शिरजगाव कसबा : कंटेनरमध्ये तब्बल ६२ गोवंश जनावरांना निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या वाहनावर बैतूल-परतवाडा राज्य महामार्गावर शिरजगाव कसबा पोलिसांनी कारवाई करून मुक्या जनावरांचे प्राण वाचविले. पोलिसांना चकमा देत चालकाने घटनास्थळाहून पलायन केले.
मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेनजीक बैतूल-परतवाडा राज्य महामार्गावर आडनदी परिसरात ३ जुलै रोजी दुपारी ५ वाजताच्या सुमारास ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी गोपनीय माहितीवरून नाकाबंदी केली होती. यादरम्यान त्यांनी आरजे ११ जीए ३५१७ क्रमांकाच्या मध्यप्रदेश सीमेतून आलेल्या कंटेनरची तपासणी केली. यामध्ये कोंबून घेऊन जात असलेले ६२ बैल आढळून आले. पंचांसमक्ष त्यांची मोजणी करण्यात आली. प्रत्येकी १५००० रुपयांप्रमाणे एकूण ९ लाख ३० हजार रुपयांचा हा मुद्देमाल होता. याशिवाय २२ लाखांचे कंटेनर जप्त करण्यात आले. सर्व जनावरे सुस्थितीत गोरक्षण संस्थान रासेगाव येथे दाखल करण्यात आली. कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ठाणेदार पंकज दाभाडे, कॉन्स्टेबल पुरुषोत्तम माकोडे, राहुल खर्चान आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.