वनोजा बाग : अंजनगाव ते दर्यापूर मार्गावर नवीन रस्ता बांधकाम काम करण्यात आले. परंतु, या मार्गावरील एकाही फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने भर उन्हात प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना उन्हाचे चटके नाहक सहन करावे लागत आहे.
तीन वर्षांपासून या मार्गाचे काम सुरू असून नवीन काम असताना प्रत्येक फाट्यावरील प्रवासी निवारे जुने झाल्याने व रस्ता रुंदीकरणाच्या मधात येत असल्याने जमीनदोस्त करण्यात आले. काही जीर्ण झाले. त्यामुळे रस्ण्याचे काम पूर्णत्वास येत असूनसुद्धा नवीन प्रवासी निवारे प्रशासनाने तयार केले नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूची मोठमोठी झाडे तोडली असल्याने झाडांची सावलीसुध्दा राहिली नसल्याने भर उन्हाळ्यात उन्हाचे चटके सोसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
कोट
प्रवासी निवाऱ्याबाबत कंत्राटदारासोबत चर्चा झाली. रस्त्याचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्यामुळे रस्त्याचे काम पुन्हा चालू झाल्यानंतर मंजूर झालेले निवारे लवकरच बांधण्यात येतील.
- संदीप देशमुख, कार्यकरी अभियंता
सा.बां. वि. दर्यापूर