आगीचा थरार : वाहनांसह दुकाने खाक; दोन नगरपालिकांचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखलअंजनगाव सुर्जी : येथील नवीन बसस्थानक परिसरात पंचायत समिती कार्यालयासमोर अतिक्रमित जागेवर असलेल्या वाहन दुरुस्तीच्या दुकानांसमोर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांना अचानक आग लागल्याने थरारक प्रसंग निर्माण झाला. एका वाहनातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसर हादरला होता. घटनेची माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते.पंचायत समितीसमोर असलेल्या वाहन दुरुस्तीच्या दुकानासमोर दुरुस्तीसाठी आलेले वाहने उभे होते. यामध्ये एम.एच. ०४ वाय-७६३१ हुंडाई सँट्रो, एम.एच.०३ एस- २६८५ फियाटची पॅन्टो व विनाक्रमांकाची मारुती ओमनी अशा तीन वाहनांचा समावेश होता. वाहनांचे काम सुरु असताना बुधवारी दुपारी ५ वाजता मध्यभागी उभ्या असलेल्या मारुती ओमनी गाडीला अचानक आग लागली. त्यामध्ये असलेल्या गॅस सिलिंंडरचा मोठा स्फोट झाला. बघता-बघता दोन दुकाने आगीत बेचिराख झाली. बाजूला उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनेसुध्दा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आगीने रौद्ररुप धारण केले होते. घटनेची माहिती अंजनगाव नगर पालिकेच्या अग्निशमन पथकाला मिळताच पालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनीही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर दर्यापूरचे अग्निशमन विभागाचे वाहनही दाखल झाले. वृत्त लिहेस्तोवर आग आटोक्यात आणण्याचे काम सुरुच होते. या घटनेमुळे पंचायत समितीसमोर आगीचा थरार निर्माण झाल्याने हजारोंच्या संख्येने नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. सिलिंडरच्या स्फोटाने आग लागल्याची माहिती अंजनगावचे तहसीलदार प्रदीप पवार यांना कळतात पोलीस निरीक्षक संजय लोहकरे हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. अंजनगाव सुर्जी व दर्यापूर या दोन्ही नगर पालिकांच्या अग्निशमन पथकाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सायंकाळपर्यत आग विझविण्याचे कार्य सुरुच होते. परंतु तोपर्यत आगीत दोन दुकाने बेचिराख झाली.कदाचित वादळ असते तर आसपासच्या आणखी काही दुकानांनी पेट घेतला असता. ही आग गावाच्या दिशेने झेपावली असती. मोठा अनर्थ नागरिक आणि नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकामुळे टळला. (प्रतिनिधी)
सिलिंडरच्या स्फोटाने अंजनगाव सुर्जी हादरले
By admin | Published: May 05, 2016 12:26 AM