लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीला १ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. अण्णाभाऊंचे अमरावती जिल्ह्याशी जवळीक होती. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे. त्याअनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना निवेदन सादर केले आहे.मनीष गवई यांच्या मागणीनुसार, सन २०२० हे अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे अतुलनीय कामगिरी केली आहे. मराठी साहित्य क्षेत्रात कथा, कादंबरीचे प्रभावी लिखाण केले आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंचे विचार नव्या पिढीला नवी प्रेरणा देणारे ठरावे, यासाठी त्यांच्या जीवनचरित्राचा समावेश करून खऱ्या अर्थाने जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यापीठाने अभिवादन करावे, असे गवई यांनी निवेदनात नमूद केले आहे. यापूर्वी अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊंच्या फकिरा या कादंबरीचा समावेश होता. मात्र, सन २०११ मध्ये अभ्यासक्रमातून ती का वगळली, हा संशोधनाचा विषय असल्याचे गवई म्हणाले. अण्णाभाऊ साठेंच्या जीवनचरित्राचा पुन्हा समावेश करावा आणि अमरावती विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांचे अध्यासन केंद्र सुरू करावे, अशी मागणी मनीष गवई यांनी केली आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती, लहुजी शक्ती सेना आदी आंबेडकरी संघटनांनीसुद्धा निवेदन दिले आहे. खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांनीदेखील कुलगुरूंना पत्र दिले आहे.अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्याबाबत निवेदन मिळाले आहे. यासंदर्भात अभ्यास मंडळाची बैठक घेण्यात येईल. अधिष्ठातांशी चर्चा केल्यानंतर अभ्यासक्रमात लवकरच अण्णाभाऊ साठेंचे जीवनचरित्राचा समावेश होईल.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, अमरावती विद्यापीठ
अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष; विद्यापीठ अभ्यासक्रमात अण्णाभाऊंच्या जीवनचरित्राचा समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 11:37 AM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे.
ठळक मुद्देमनीष गवई यांची मागणी, आज शंभरावी जयंती